रिंकू राजगुरू आणि तिची आई
मुंबई, 18 जुलै : सैराट सिनेमातून मराठी सिनेसृष्टीला लाभलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. सैराट सिनेमा रिलीज होऊन आज 7 वर्ष झालीत. तरीही सैराटच्या आर्चीची क्रेझ कायम आहे. नागराज मंजुळेंनी दिग्दर्शित केलेला सैराट या सिनेमा 100 कोटींची कमाई केली. त्यानंतर सिनेमा हिंदी आणि तमिळमध्ये डब करण्यात आला. सैराट सिनेमाची चर्चा होत असताना इकडे आर्ची म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरूला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिला अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. रिंकू आज मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री आहे. बाहेर तिचे खूप फॅन आहेत. पण तरीही रिंकूचे पाय जमिनीवर आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का बाहेर जरी रिंकूला इतकं स्टारडम असलं तरी घरी तिला आईच्या कडक शिस्तीला सामोरं जावंच लागतं. सुपरस्टार असलेल्या रिंकूची आई तिच्याबरोबर घरी असताना कशी वागते हे रिंकूनं एका मुलाखतीत सांगितलं. अभिनेत्री रिंकू राजगुरूने साकारलेली आर्ची इतकी लोकप्रिय झाली की बॉलिवूड ते साऊथ इंडस्ट्रीतही तिची क्रेझ निर्माण झाली. सैराटनंतर रिंकूनं ‘कागर’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘झुंड’, ‘मेकअप’ सारख्या अनेक सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये काम केलं. या सगळ्या काळात तिनं आयुष्यात अनेक गोष्टी बदलल्या असल्या तरी रिंकूच्या खाण्याच्या सवयी काही बदलेल्या नाहीत. याचं कारण आहे तिची आई. रिंकू तशी एकूलती एक लेक असल्यानं तिचे खूप लाड होत असतील असं सर्वांना वाटत असेल पण रिंकू तिच्या आईच्या कडक शिस्तीत लहानाची मोठी झाली आहे. हेही वाचा - Rinku Rajguru : मैत्रिणींबरोबर बाहेर गेल्यानंतर रिंकू पिझ्झा बर्गरवर मारते ताव? सांगून टाकला आवडता पदार्थ
एका मुलाखतीत रिंकूला तु लहान असताना कशी होतीस? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत रिंकू म्हणाली, “माझी आई सांगते लहानपणी मी भाज्या खात नव्हते. आईने कधीच माझे लाड केले नाहीत. भाजी आवडत नाही म्हणून तिने दुसरी भाजी करून दिली नाही असं कधीही झालं नाही. आई म्हणाली, बाकिच्यांसारखे आम्ही लाड केले नाहीत. खायचं तर खा नाही तर उपाशी राहा”.
रिंकू पुढे म्हणाली, “आई खूप शिस्तीची होती त्यामुळे लहानपणापासून सगळं खाण्याची सवय लागली. मेथी, पालक सगळ्या गोष्टी आईने खाऊ घातल्या. आता मी स्टार झाले असले तर आई कोणतेही नखरे सहन करत नाही. आमच्या घरी रोज वेगवेगळ्या भाज्या असतात. तिला कधी नाही म्हटलं तर ती म्हणते, मी एवढं करून ठेवलंय. आता खा नाही तर उपाशी मरा. आई करायचे तेव्हा खूप लाड करते. इतर वेळेस नखरे खपवून घेतले जात नाहीत”.