वेड
मुंबई, 14 जानेवारी: रितेश आणि जिनिलियाच्या वेड चित्रपटाची सगळ्यांनाच भुरळ पडली आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच चलती आहे. या चित्रपटापुढे बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांचीही अवस्था वाईट झाली आहे. ‘वेड’ मुळे मराठी चित्रपटासाठी नव्या वर्षाची सुरुवात धुमधडाक्यात झाली आहे. वेड’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून उत्तम कामगिरी करताना दिसतोय. बॉक्स ऑफिसवर वेडनं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत त्यानं सर्वांना वेड लावलंय असं म्हणायला हरकत नाही. आता रितेशचं सगळीकडेच कौतुक होत असताना एका चाहत्यानं मात्र त्याला अनोखा सल्ला दिला आहे. रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ने तिसऱ्या आठवड्यात पदार्पण केलं आहे पण अजूनही या सिनेमाचं वेड महाराष्ट्रात पाहायला मिळते आहे. रितेशन अलीकडेच सिनेमाच्या कमाईबद्दल पोस्ट केली आहे. वेडनं दुसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी 2.52 कोटी, शनिवारी 4.53, रविवारी सर्वाधिक 5.70 कोटींची कमाई केली आहे. तर या सिनेमाची संपूर्ण कमाई 40.85 कोटींच्या पार गेली आहे. रितेशने पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. शेअर केलेल्या या लेटेस्ट पोस्टवरही चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हेही वाचा - Mulagi Zali Ho: ‘अनेक अडचणी आल्या पण…’ मालिकेच्या शेवटच्या दिवशी भावुक झाला माऊचा शौनक जिनिलिया-रितेशचे कौतुक करणाऱ्यांमध्ये इंडस्ट्रीतील कलाकारही आहेत. या दरम्यान रितेशच्या एका चाहत्याने केलेली कमेंट विशेष चर्चेत आली. त्याने रितेशवरील प्रेमापोटी त्याला एक सल्ला दिला आहे. रितेशच्या या पोस्टवर कमेंट करताना त्याच्या चाहत्याने लिहिले की, ‘भाऊ तुम्ही मराठीतच चित्रपट करत जा, हिंदी चित्रपटात सहकलाकार म्हणून काम करण्यापेक्षा मराठी चित्रपटातील सुपरस्टार होऊन राहा. हिच विनंती’. रितेशच्या या चाहत्याची कमेंट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
रितेशने आतापर्यंत मराठीमध्ये केलेले चित्रपट विशेष लोकप्रिय ठरले. ‘लय भारी’, ‘माऊली’नंतर आता ‘वेड’लाही प्रेक्षकांनी आपलेसे केले. रितेशच्या यापूर्वीच्या मराठी सिनेमांनीही चांगला गल्ला जमवला होता. याशिवाय मराठी प्रेक्षकांकडून रितेशला नेहमीच विशेष प्रेम मिळत आले आहे, त्यामुळेच त्याच्या चाहत्याने असा सल्ला दिला असावा.
रितेशने आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात काम केलं आहे. पण त्याला मुख्य भूमिकेत फार कमी वेळा पाहिलं गेलं आहे. अनेक वेळा रितेशने बॉलिवूडमध्ये साईड रोलचं केला आहे. पण त्याचे मराठी सिनेमे विशेष गाजले आहेत. त्यामुळे चाहत्याने रितेशला दिलेला हा सल्ला आता चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. प्रदर्शनानंतरच्या दुसऱ्या रविवारी 5.70 कोटींची कमाई करत, एका दिवसात सर्वाधिक कमाई करण्याचा ‘सैराट’चा रेकॉर्ड मोडला होता. तर रितेशने त्याचाच सिनेमा ‘लय भारी’च्या एकूण कमाईचा आकडाही केव्हाच पार केला आहे. त्यामुळे आता रितेशचा सर्वाधिक हिट ठरलेला मराठी सिनेमा म्हणून ‘वेड’चे नाव घ्यावे लागेल.