मुंबई, 07 सप्टेंबर : सध्या मराठी सिनेसृष्टीत एका अभिनेत्याचं नाव चर्चेत आहे तो अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. चंद्रमुखी आणि त्यानंतर आलेल्या धर्मवीर या दोन्ही सिनेमातून त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. एका सिनेमाचा दिग्दर्शक तर दुसऱ्या सिनेमात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत असलेल्या प्रसादनं तारेवरची कसरत करत दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडल्या. चंद्रमुखी आणि धर्मवीरच्या अफाट यशनंतर प्रसाद ओक दिग्दर्शित नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. न्यूज18 लोकमतच्या बाप्पा मोरया या कार्यक्रमात प्रसादनं त्याच्या नव्या सिनेमाची माहिती दिली. चंद्रमुखी हा सिनेमा प्रसादसाठी ड्रिम प्रोजेक्ट होता. विश्वास पाटलांच्या कांदबरीवर आधारीत चंद्रमुखी सिनेमा प्रसादनं दिग्दर्शकाच्या नजरेनून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. त्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीतील प्रतिभावान कलाकार दिवगंत ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या आयुष्यावर आधारीत जीवनपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून प्रसादनं प्रोजेक्ट साइन केलं असून नव्या सिनेमाची घोषणा करताना प्रसादच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळाला. हेही वाचा - Prasad oak : धर्मवीर आनंद दिघेंच्या पुण्यतिथीदिवशी प्रसाद ओकनं केली मोठी घोषणा; ऐकून वाटेल अभिमान
निळू फुले यांच्या आयुष्यावरील बायोपिक टीप्सचे कुमार तवरामी सिनेमाचे निर्माते आहेत. तर किरण यज्ञ्योपवीत सिनेमाचं लेखन करत आहेत. याविषयी सांगताना प्रसाद म्हणाला, ‘2022 हे वर्ष माझ्यासाठी फार खास ठरलं. चंद्रमुखी माझं ड्रिम प्रोजेक्ट आणि त्यानंतर धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर हा सिनेमा पुढच्या पंधरा दिवसात प्रदर्शित झाला. दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. जे जे एका कलाकाराला हवं असतं एका दिग्दर्शकाला हवं असतं ते अचानक एकाच वर्षात बाप्पानं मला दिलं आहे. हा निव्वळ बाप्पाचा आशिर्वाद आहे’. प्रसाद पुढे म्हणाला, ‘मला वाटतं बाप्पानंच मला एवढे वर्ष थांबवलं असेल. तो म्हणाला असेल तुला थांबवल आहे एवढे वर्ष पण तुझी वेळ येईल तेव्हा दोन्ही गोष्टी मी तुला देईन. असे दोन्ही आशिर्वाद बाप्पानं मला या वर्षात दिले. त्याचप्रमाणे आता निळू फुले यांच्यावर आधारित सिनेमा मी दिग्दर्शित करतोय हा तिसरा आशिर्वाद बाप्पानं मला या वर्षी दिला आहे.