शाहरुख खान
मुंबई, 18 डिसेंबर : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पठाण’मुळे सध्या चांगलाच वादात सापडला आहे. शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणं रिलीज झाल्यापासून चित्रपटाला विरोध होत आहे. या गाण्यामध्ये घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या असल्याचं म्हटलं जात आहे. प्रत्येक क्षेत्रातून आणि देशातील अनेक ठिकाणावरुन या चित्रपटाला विरोध केला जात आहे. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. त्यामुळे सध्या शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणच्या अडचणी वाढल्या असल्याचं दिसत आहे. अशातच शाहरुख खानची प्रकृती ठीक नसल्याचही समोर आलं आहे. शनिवारी किंग खानने 15 मिनिटे सोशल मीडियावर आस्क मी एनीथिंग सेशन घेतलं. यावेळी अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. या सेशन दरम्यान शाहरुखने तो इन्फेक्शनमुळे थोडा आजारी असल्याचं सांगितलं. शाहरुख खानच्या तब्येतीचे अपडेट मिळाल्यानंतर त्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत आणि तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
शाहरुख खानला इन्फेक्शनच्या त्रासामुळे डाएट फॉलो करावा लागत आहे. शाहरुख खानने सांगितलं ‘इन्फेक्शनमुळे मला आजकाल बरं वाटत नाही, म्हणून मी फक्त डाळ आणि भात खात आहे’. मात्र शाहरुख खाननं उत्तर देताना हे स्पष्ट केलं नाही की त्याला कशामुळे आणि काय इन्फेक्शन झालं आहे.
दरम्यान, शाहरुख खान आगामी ‘पठाण’ चित्रपटात एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे पहिलं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानच्या गाण्याची धमाकेदार केमिस्ट्री पहायला मिळत आहे. मात्र शाहरुख आणि दीपिकाच्या या गाण्यावरून सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होताना आणखी काय नवा वाद निर्माण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.