ऑस्कर 2023
मुंबई, 12 मार्च : यंदाचा ऑस्कर पुरस्कार भारतासाठी खास असणार आहे. सगळ्यांचे लक्ष आता ऑस्करच्या शानदान सोहळ्याकडे लागले आहे. ऑस्करच्या विजेत्यांची घोषणा अवघ्या काही तासात होणार आहे. यंदाच्या अकादमी पुरस्कारांमध्ये भारताला प्रथमच तीन नामांकने मिळाली आहेत. यामध्ये एसएस राजामौली यांच्या RRR या सुपरहिट चित्रपटातील नातू-नातू या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी नामांकन मिळाले आहे. तसेच “ऑल दॅट ब्रेथ्स” आणि “द एलिफंट व्हिस्पर्स” यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर आणि सर्वोत्कृष्ट लघु माहितीपटासाठी नामांकने मिळाली आहेत. त्यामुळे यंदाचं वर्ष भारतासाठी खूपच खास ठरणार आहे. या नामांकनाव्यतिरिक्त ऑस्करच्या दिमाखदार सोहळ्यात बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील सादरकर्ता असणार आहे. भारतीय प्रेक्षक सोमवारी सकाळी 6:30 वाजल्यापासून डिस्ने + हॉटस्टारवर ऑस्करचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतील. हा सोहळा हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. Oscar 2023: ऑस्करमधून ‘रेड कार्पेट’च होणार गायब; 62 वर्षातून पहिल्यांदा दिसणार बदल, पण का? एसएस राजामौली यांच्या RRR या सुपरहिट चित्रपटातील ‘नाटू नातू’ हे गाणं ऑस्कर पटकावणार का याची सगळ्यांनाच आतुरता आहे. पण यंदा ऑस्करच्या मंचावर या गाण्यावर जोरदार सादरीकरण देखील होणार आहे. गायक राहुल सिपलीगुंज आणि काळ भैरव, ज्यांनी मूळ गाण्याला आपला आवाज दिला आहे, तसेच संगीतकार एमएम कीरवाणी यांच्या हे ऑस्करच्या प्रेक्षकांसाठी या गाण्यावर दमदार परफॉर्मन्स सादर करताना दिसणार आहेत. सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या नामांकित व्यक्तींचे लाइव्ह परफॉर्मन्स अनेक वर्षांपासून ऑस्कर परंपरेचा भाग आहेत. पण यंदा भारतीयांसाठी नातू नातू वर होणारं सादरीकरण ही अभिमानाची बाब आहे. ‘नातू नातू’ ने या वर्षाच्या सुरुवातीला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि समीक्षकांचा चॉईस पुरस्कार जिंकला आहे. त्यामुळे या गाण्याने आता ऑस्करही जिंकावा अशीच भारतीयांची इच्छा आहे. राम चरण, NTR जूनियर आणि दिग्दर्शक SS राजामौली यांची ‘RRR’ टीम आधीच लॉस एंजेलिसमध्ये सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सज्ज झाली आहे.
शौनक सेन यांच्या हवामान बदलावरील माहितीपट ‘ऑल दॅट ब्रेथ्स’ या चित्रपटालाही यामध्ये नामांकन मिळाले आहे. ‘ऑल दॅट ब्रीद्स’ला डॉक्युमेंटरी फीचर फिल्म कॅटेगरीत ऑस्कर नामांकन मिळाले आहे. दिल्लीतील मोहम्मद सौद आणि नदीम शहजाद या भावंडांची ही कथा आहे, ज्यांनी जखमी पक्ष्यांना, विशेषतः काळ्या पतंगांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. तसेच ‘द एलिफंट व्हिस्पर्स’या लघुपटाला देखील यंदाच्या ऑस्करमध्ये नामांकन मिळालं आहे. ऑस्कर विजेत्यांना मिळणारी रक्कम शून्य आहे, पण हा पुरस्कार मिळाल्यानंतर ऑस्कर विजेत्याच्या मानधनात 20% पर्यंत वाढ होते, त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष काहीही मिळत नसले तरी त्यामुळे त्यांचे उत्पन्न नक्कीच वाढते.