मुंबई, 3 सप्टेंबर- बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रींग प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली होती. यानंतर आता आणखी एक अभिनेत्री चर्चेत आली आहे. काल सुकेश चंद्रशेखर प्रकरणात पुन्हा अभिनेत्री नोरा फतेहीची दिल्ली पोलिसांकडून तब्बल 6 तास चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे नोराच्या अडचणीत वाढ झाली आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात यापूर्वीही अभिनेत्री नोरा फतेहीची चौकशी करण्यात आली होती. काल दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेत्रीची तब्बल 6 तास चौकशी केली आहे.सुकेश चंद्रशेखरवर तब्बल 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्याने फोर्टेस हेल्थ केअरचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंह यांच्या पत्नीकडून 200 कोटी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही बॉलिवूड अभिनेत्री या मनी लॉन्ड्रींग प्रकरणातील सुकेश चंद्रशेखरसोबत संपर्कात असल्याचं आढळून आलं होतं. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांचा समावेश आहे. त्यामुळे या दोघींची वारंवार चौकशी होत असते. दरम्यान नोरा फतेहीला गेल्या आठवड्यात समन्स पोलिसांकडून समन्स बजावण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी अभिनेत्री चौकशीसाठी उपस्थित होती. मिळालेल्या माहितीनुसार, ती सकाळी 11 वाजता कार्यालयात दाखल झाली होती. आणि तब्बल 6 तसानंतर म्हणजेच 6 वाजता ती कार्यालयातून बाहेर पडताना दिसून आली.
(हे वाचा: Jacqueline Fernandez साठी सुकेशनं श्रीलंका-बहरिनमध्ये घेतलं होतं आलिशान घर, समोर आली महत्त्वाची माहिती ) या प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससुद्धा गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. जॅकलिन आणि सुकेश चंद्रशेखरचे काही खाजगी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे एकच खळबळ माजली होती . सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचंही सांगितलं जातं. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीला बिग बजेट सिनेमात मुख्य भूमिका देण्याचं वचनही त्याने अभिनेत्रीला दिलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणात दिल्ली पोलीस 12 सप्टेंबरला जॅकलिनची चौकशी करणार आहेत.