JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सरकारकडून हुंडा प्रथेचं समर्थन? गडकरींनी शेअर केलेल्या अक्षय कुमारच्या त्या VIDEO वरुन राजकारण

सरकारकडून हुंडा प्रथेचं समर्थन? गडकरींनी शेअर केलेल्या अक्षय कुमारच्या त्या VIDEO वरुन राजकारण

सहा एअरबॅग्जचा (Six Airbags) मुद्दा गडकरी यांनी लावून धरला असून, या मुद्द्याचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या काही जनजागृतीपर जाहिरातींचे व्हिडिओज गडकरी यांनी ट्विटरवरून शेअर केले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 12 सप्टेंबर : नामवंत उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा 4 सप्टेंबरला रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर रस्त्यावरची सुरक्षितता, वाहतूक नियम, एअरबॅग्ज आदी विषयांवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने काही घोषणा केल्या आहेत. कारमध्ये पाठीमागे बसलेल्या व्यक्तींनाही सीटबेल्ट्स लावणं बंधनकारक करणं, तसंच कारमध्ये सहा एअरबॅग्ज असणं आणि अन्य बाबींसाठी वाहतुकीच्या नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा लवकरच केल्या जाणार असल्याचं गडकरी  यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं होतं. सीटबेल्ट न लावल्यास कारमध्ये वाजणारा अलार्म बंद होण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लिप्सवर बंदी घालण्यात येणार असून, या क्लिप्सची ऑनलाइन विक्री थांबवण्याचं आवाहनही गडकरी यांनी अ‍ॅमेझॉनला केलं होतं. दरम्यान, सहा एअरबॅग्जचा (Six Airbags) मुद्दा गडकरी यांनी लावून धरला असून, या मुद्द्याचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या काही जनजागृतीपर जाहिरातींचे व्हिडिओज गडकरी यांनी ट्विटरवरून शेअर केले आहेत. या जाहिरातींत अभिनेता अक्षय कुमारने काम केलं आहे. त्यातल्या एका जाहिरातीच्या व्हिडिओवर मोठी टीका होत आहे. त्या जाहिरातीतून हुंड्याला प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप आक्षेप घेणाऱ्यांकडून केला जात आहे. ‘फर्स्टपोस्ट’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. Akshay Kumar : ‘तू सेटवरचं जीवन होतास’; जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक ‘सहा एअरबॅग्ज असलेल्या गाडीतून प्रवास करून जीवनाचं रक्षण करा,’ अशी कॅप्शन देऊन गडकरी यांनी 9 सप्टेंबरला एक व्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या एका मिनिटाच्या या जनजागृतीपर व्हिडिओला आतापर्यंत नऊ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्या व्हिडिओत अभिनेता अक्षयकुमार एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. नुकतंच लग्न झालेली आपली मुलगी आणि जावयाला मुलीचे वडील निरोप देत असून, नव्या गाडीतून त्यांची पाठवणी केली जात आहे. त्यावेळी मुलगी आणि मुलीचे वडील दोघंही रडत आहेत. तेवढ्यात पोलीस अधिकारी मुलीच्या वडिलांना सांगतो, की ‘अशा गाडीतून मुलीला पाठवलं, तर रडण्याची वेळ येणारच.’ त्यावर मुलीचे वडील ‘गाडीत काय कमी आहे?’ असं विचारून गाडीतल्या सगळ्या फीचर्सबद्दल सांगतात; मात्र त्यावर पोलीस अधिकारी म्हणतो, की ‘एवढं सगळं असलं, तरी एअरबॅग्ज दोनच आहेत ना? सहा का नाहीत? अपघात झाला, तर फक्त पुढच्या बाजूलाच एअरबॅग्ज उघडतील. मुलगी आणि जावयाचा जीव धोक्यात आहे.’ त्यानंतर त्या व्यक्तीची नवविवाहित मुलगी आणि जावई तातडीने त्या कारमधून उतरताना दिसतात. त्यांच्यासाठी नवी गाडी येते आणि त्यात सहा एअरबॅग्ज असतात.

संबंधित बातम्या

सहा एअरबॅग्जबद्दल जागरूकता करण्याच्या उद्देशाने ही जाहिरात केलेली आहे; मात्र यातून हुंड्याला (Dowry) प्रोत्साहन दिलं जात आहे, अशी टीका केली जात आहे. शिवसेना नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी हाच मुद्दा घेऊन या जाहिरातीवर टीका केली आहे. ‘ही किती प्रॉब्लेमॅटिक जाहिरात आहे. अशा जाहिराती कोण मंजूर करतं? सरकार या कारच्या सुरक्षिततेबद्दल जागरूकता करण्यासाठी या जाहिरातीवर पैसे खर्च करत आहे, की हुंड्याच्या गुन्हेगारी कृत्याला प्रोत्साहन करण्यासाठी,’ असा सवाल चतुर्वेदी यांनी गडकरींचं ट्विट रिट्विट करून केला आहे. Salman Khan: सलमान खानला पुन्हा धमकी? मुंबई पोलीस पोहोचले अभिनेत्याच्या घरी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले (Saket Gokhale) यांनीही या मुद्द्यावरून व्हिडिओवर टीका केली आहे. ‘सरकार यातून अधिकृतरीत्या हुंड्याचं समर्थन करत आहे, हे दुर्दैवी आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, त्यांनी आणखीही एक मुद्दा उपस्थित केला आहे. ‘सायरस मिस्त्री यांचा मृत्यू रोडचं डिझाइन सदोष असल्यामुळे झाला. त्यांचा अपघात झालेलं ठिकाण अपघातप्रवणच आहे. रस्ते सुधारण्याऐवजी सहा एअरबॅग्जच्या आणि महागड्या कार्सचा मुद्दा रेटून जबाबदारी टाळण्याचा हा अनोखा मार्ग आहे,’ असं गोखले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. एअरबॅग्जच्या एकाच मुद्द्यावर एवढा जोर देण्यापेक्षा रस्त्यांचं डिझाइन, बांधणी यांवर भर दिला पाहिजे, असं मत आणखीही अनेकांनी व्यक्त केलं आहे. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणणं ही काळाची गरज असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. जाहिरातीतल्या नवदाम्पत्याने सीटबेल्ट लावलेले नसल्याकडेही एकाने लक्ष वेधलं आहे. ‘सहा टक्क्यांहून कमी भारतीयांकडे कार्स आहेत. त्यापैकी निम्म्याहून अधिक जणांकडे असलेल्या कार्समध्ये एकही एअरबॅग नाही. बहुतांश जीवघेणे अपघात दुचाकीचालकांचे होतात. वाईट रस्ते आणि खराब पायाभूत सुविधा (Bad Infrastructure) हेच अपघातांचं मोठं कारण आहे,’ असं एकाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या