अमेय खोपकर
मुंबई, 16 नोव्हेंबर : मागचे काही महिने बॉलिवूड सातत्यानं वादात येत आहे. अनेक वादग्रस्त सिनेमांचा बॉलिवूडला चांगलाच फटका बसला आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बॉलिवूडला इशारा देण्यात आला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा बॉलिवूडवर तोफ डागली आहे. मनसे आधापासूनच बॉलिवूडमध्ये असलेल्या पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात आहे. याआधाही मनसेनं अनेक वेळा बॉलिवूडमधील पाकिस्तानी कलाकारांना हाकलून देण्यासाठी भूमिका घेतली होती. यावेळी पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूड किंवा इतर भाषेतील सिनेमात काम दिल्यास गंभीर परिणाम भागावे लागतील असा इशारा देण्यात आला आहे. मनसे नेते अमेय खोपकर हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असते. ट्विटच्या माध्यमातून बॉलिवूड तसेच सिनेसृष्टीत घडणाऱ्या काही घडामोडींवर भाष्य करत असतात. अमेय खोपकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय, असं कानावर येतंय. ही नीच प्रवृत्ती वेळोवेळी ठेचावीच लागेल, म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दांत इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मत्यांना भोगावे लागतील. अमेय खोपकरांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी कलाकारांविरोधात अमेय खोपकर नेहमीच आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं आहे. याआधीही मनसेनं अनेक वेळा बॉलिवूडमधील पाकिस्तानी कलाकारांचा विरोध केला आहे. 2021मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला भारतात काम करू दिलं जाणार नाही असं वक्तव्य केलं होतं. त्याआधीही 2019मध्ये ऑन इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनं पुलवामा आतंकवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर पूर्णपणे निर्बंध आणण्याची घोषणा केली होती. अमेय खोपकर यांनी केलेल्या या ट्विटवर अनेकांनी अभिनेता अक्षय कुमारच्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील फोटो आणि नव्या सिनेमाची आठवण करून दिली आहे. अभिनेता अक्षय कुमार येऊ घातलेल्या वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अक्षय कुमारची घोषणा करण्यात आली. तसंच राज ठाकरे यांनी अक्षयची महाराजांच्या भूमिकेसाठी निवड केल्याचं अक्षयनं सांगितलं आहे. ( बातमी अपडेट होत आहे )