मुंबई, 11 जुलै : मिरा नायर (Mira Nair) दिग्दर्शित ‘ए सुटेबल बॉय’ (A Suitable Boy) या वेबसीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. काही तासातंच या ट्रेलरने सोशल मीडियावर पसंती मिळवली आहे. ‘बीबीसी वन’ची सीरिज असणारी ए सुटेबल बॉय चाहत्यांच्या पसंतीस उतरेल, अशा प्रतिक्रिया या ट्रेलरनंतर समोर येत आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील सुंदर वर्णन या सीरिजमध्ये पाहायला मिळते आहे. राजकीय घडामोडी, भारतीय परंपरा यांसारख्या विविध विषयांवर ही सीरिज भाष्य करते. या ट्रेलरमध्ये सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या अभिनेत्री तब्बू (Tabbu) वर. तबूचा ताकदीचा अभिनय या सीरिजमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. यामध्ये तब्बूने अभिनेता इशान खट्टर (Ishan Khattar) बरोबर रोमँटिक सीन केले आहेत. दोघांची केमिस्ट्री या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. ही सीरिज विक्रम सेठ यांची प्रसिद्ध कादंबरी ‘ए सुटेबल बॉय’वर आधारित आहे.
साल 1993 मध्ये विक्रम सेठ यांची कादंबरी ‘ए सुटेबल बॉय’ प्रदर्शित झाली होती. यामध्ये स्वातंत्र्यानंतरचा काळ दाखवण्यात आला आहे. 4 कुटुंबांची ही कहाणी आहे तर विद्यापिठातील एक विद्यार्थी या कहाणीचा निवेदक आहे. या कादंबरीमध्ये लखनऊ, दिल्ली, पटना बनारस आणि कोलकातामधील राजकीय घडामोडी खूप सुंदरपणे मांडण्यात आल्या आहे. जेवढी प्रसिद्धी या कादंबरीला मिळाली होती, तेवढीच सीरिज प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
(हे वाचा- सुशांत आत्महत्या प्रकरण : सुब्रमण्यम स्वामींची वकिलाकडे CBI चौकशीबाबत विचारणा ) या वेब सीरिजची पटकथा Andrew Devies यांनी लिहिली आहे. यामध्ये तब्बू आणि इशान खट्टर बरोबरच रसिका दुगल, विवियान शाह, राम कपूर आणि नमित दास महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 26 जुलै रोजी या वेब सीरिजचा पहिला एपिसोड प्रदर्शित होणार आहे.