मुंबई, 25 ऑगस्ट: झी मराठीवरील अल्पावधतीच लोकप्रिय झालेल्या बस बाई बस या कार्यक्रमाची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महिला राजकारण्यांनंतर बस बाई बसच्या मंचावर एकाहून एक सरस अभिनेत्रींनी हजेरी लावली आहे. मागच्या आठवड्यात अभिनेत्री क्रांती रेडकरनं धम्माल उडवून दिली. तर या आठवड्यात महाराष्ट्राची क्रश अर्थात अभिनेत्री हृता दुर्गुळे सहभागी होणार आहे. या आठवड्याच्या एपिसोडचा प्रोमो समोर आला असून हृता सुबोध भावेच्या प्रश्नांची दमदार उत्तर देत अभिनेत्रीनं सिनेमा आणि मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांविषयी खूप महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. हृताच्या एंट्रीनं बस बाई बसचा एपिसोड पाहण्यासाठी हृताचे चाहते आतूर झाले आहेत. बस बाई बसच्या मंचावर सूत्रधार सुबोध भावे त्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या सेग्मेंटनं येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला त्याच्या पद्धतीनं बोलत करण्याचा प्रयत्न करत असतो. कार्यक्रमात एक गेम खेळला जातो ज्यात विचारलेल्या प्रश्नांची होय किंवा नाही अशी उत्तर द्यायची असतात. या सेगमेंटमध्ये सुबोधनं हृताला अनेक प्रश्न विचारले. ‘सिनेमात काम करणारे कलाकार मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना कमी लेखतात का? ‘, असा प्रश्न सुबोधनं हृताला विचारला. हृतानं लगेचच या प्रश्नाचं ‘होय’ असं उत्तर दिलं. तिच्या उत्तरानं सगळ्यांच भुवया उंचावल्या. हेही वाचा - Hruta Durgule : हृताचं ओटीटीवर पदार्पण, पहिल्या वहिल्या वेब सीरिजची फर्स्ट लुक आला समोर हृताच्या होय अशा उत्तरावर सुबोधनं तिला ‘कोण आहेत असे? मला सांग जरा?’, त्यावर हृतानं ‘नाही नाही’, असं उत्तर दिलं. यावर मंचावर एकच हशा पिकला. हृता म्हणली, ‘मी त्यांची नावं नाही सांगणार पण हे एविडेंट आहे. सेटवर त्यांच्या वागण्या बोलण्यावरुन त्यांच्या वाइब्सवरुन कळतं’.
पुढे सुबोधनं हृताला विचारलं की, ‘म्हणजे ते कलाकार मोठ्या पडद्यावर दिसतात म्हणून ते स्वत: भारी समजतात आणि तुम्ही छोट्या पडद्यावर दिसता म्हणून तुम्हाला कमी समजतात?’, यावर हृता म्हणाली, ‘मला खरं माहिती नाही पण एक गोष्ट हे की टेलिव्हिजन कलाकार फार प्रसिद्ध असतात. कारण ते दररोज रोज प्रेक्षकांच्या घरात पोहोचतात’. बस बाई बसमध्ये हृतानं केलेल्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हृता कार्यक्रमात आणखी काय काय रंगत आणणार हे येत्या शुक्रवार आणि शनिवारी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.