महाराष्ट्राची हास्यजत्रा
तुषार शेटे, मुंबई, 13 जुलै : गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्यांच्या टेन्शनवरची मात्रा ठरलेलं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो प्रचंड गाजतोय. यातल्या कलाकारांनी प्रत्येकांच्या मनात स्वत:च आगळं वेगळं स्थान निर्माण केलंय. या शो मधले, समीर चौघुले, गौरव मोरे, पृथ्विक प्रताप, दत्तू मोरे,अमिर हडकर, प्रियदर्शिनी इंदलकर, चेतना भट, वनिता खरात, शिवाली परब, जवळपास महिनाभरासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. 4 ते 28 जुलै दरम्यान महराष्ट्राची हास्यजत्राचे 11 शो होणार आहे. आत्तापर्यंत टेम्पा, अटलांटा, बोस्टन, न्यू जर्सी इथे शो झालेत तर पुढच्या काही दिवसात टोरॅन्टो, वॉशिंटन डिसी, डल्लास, सिएटल, सॅनजोस, सॅन दिएगो, या ठिकाणी हे शो पार पडणार आहेत. 5 डायमेंशन या संस्थेच्या वतीने आणि प्रमोद पाटील, यतिन पाटील आणि शैलेष शेट्ये यांच्या पुढाकाराने अमेरिकेत हे प्रयोग होत आहेत. अमेरिकेच्या दौऱ्यात आलेला आगळावेगळा अनुभव अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने शेअर केलाय. 9 जुलैला हास्यजत्रेचा न्यू जर्सीमध्ये संध्याकाळी 4 वाजता शो होता. मात्र वादळी हवामानामुळे न्यू जर्सीला जाणाऱ्या सगळ्या फ्लाईट्स रद्द झाल्या होत्या. बोस्टनवरून न्यूजर्सीला जाण्यासाठी एकही फ्लाईट मिळत नव्हती. सगळ्या फ्लाईट्स रद्द झाल्या होत्या. दुपारचे 2 वाजले तरीही हास्यजत्रेची टीम बोस्टनमध्येच होती. त्यामुळे न्यू जर्सीचा शो रद्द करण्याची वेळ आली होती. शो रद्द होईल या भीतीने सगळे अस्वस्थ झालेले असताना अमित फाळके यानी अत्यंत सकारात्मक विचार करत सर्वाना दिलासा दिला. थोड्याच वेळात तिथे बोस्टन महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी पोहोचले. त्यांची आणि फाळकेंची चर्चा झाल्यानंतर न्यूजर्सीला बाय रोड जाण्याचा निर्णय घेतला. टीमसाठी थोड्याच वेळा कार्सची व्यवस्था झाली. गाडया बाहेर उभ्या होत्या पण सगळ्यांच्या बॅग्स आल्या नव्हत्या. संपूर्ण टीम तासभर एयरपोर्ट वरच ताटकळत होती. न्यू जर्सीमध्या वाट पहात असेल्या मराठी प्रेक्षकांना इमेल पाठवून सांगण्यात आलं की 4 चा शो 7 वाजता सुरू होईल. 5 तासांचा प्रवास होता. त्यात ट्रॅफिक जॅमची भीती सुध्दा होती. कलाकारांना जेवणासाठीही थांबता येणं शक्य नव्हतं. एका ठिकाणी थांबून या टिमने जेवण पार्सल घेतलं आणि सुरू झाला प्रवास न्यूजर्सीच्या दिशेने.
7 वाजता शो सुरू होणार असं प्रेक्षकांना सांगण्यात जरी आलं असलं तरी ट्रॅफिक जॅममुळे टीम प्रवासातच होती. मायबाप प्रेक्षकांना आणखी वाट पाहायाला लागू नये यासाठी टीमने गाडीतच मेकअप केला. तरीही प्रेक्षकांना आश्वासीत करता यावं यासाठी लाइव्ह झूम कॉल आणि आणि समीर चौघुलेंनी टीमच्या वतीने थेट प्रेक्षागृहात संवाद साधला.‘आम्ही तुमच्यासाठीच येतोय अजून थोडा वेळ थांबा’ असं सांगत सर्वाना आश्वस्त केलं. धर्मेंद्रना कधीच पाहायचा नव्हता हेमा मालिनी अन् बिग बींचा ‘बागबान’? अभिनेत्रीने अखेर सांगूनच टाकलं हा आगळा वेगळा अनुभव सांगताना प्रियदर्शनी म्हणाली, ‘त्या दिवशी हास्यजत्रेची पुण्याई कळाली. जवळपास 900 लोक, sold out show, 4 तास आमची वाट पाहत होते आणि टाळ्यांच्या गजरात आमचं स्वागत झालं. खूप लांबून लोक आले होते आणि सगळे थांबले होते. काही जण तर 12 तासांचा प्रवास करुन आलेले आणि ते आणखी 6 तास थांबले, कोणीही तिकिटाचे पैसे परत मागितले नाही. हास्यजत्रेवरचं हे प्रेम पाहून आम्ही सगळे भारावून गेलो होतो. पहाटेपासून सुरु झालेला प्रवास अखेर सफल झाला. सगळे खूप थकले होते पण प्रेक्षागृहात हशा आणि टाळ्या इतक्या होत्या की त्यात आमचा थकवा विरुन गेला. मायबाप प्रेक्षकांचा आशीर्वाद काय असतो ते अनुभवलं आम्ही! आमच्या संपूर्ण टीमची आठवण काढली. मी नशिबवान आहे की या टीमचा भाग आहे. USA Tour मधल्या NJ च्या शो साठी केलेली धावपळ आणि त्यावरचा प्रतिसाद हा कायम आठवणीत राहील.’
महाराष्ट्राची हास्यजत्रातील कलाकारांना सातासमुद्रापार मराठी प्रेक्षकांचं मिळालेलं हे प्रेम चर्चेचा विषय ठरतंय.