लक्ष्मीकांत बेर्डे
मुंबई, 24 फेब्रुवारी- मराठी सिनेसृष्टीतील अफाट लोकप्रिय आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे होय. या अवलियाने आपल्या अनोख्या शैलीच्या जोरावर लोकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या अभिनेत्याला वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वजण ‘लक्ष्या’ या नावानेच आजही बोलतात. कारण हा अभिनेता सर्वसामान्य लोकांना आपलासा वाटतो. ते त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात. त्यामुळेच लोक लक्ष्मीकांत यांचा एकेरी उल्लेख करतात. लक्ष्मीकांत यांनी कमी वयात जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला होता. दरम्यान इतक्या वर्षानंतर आता सोशल मीडियावर लक्ष्मीकांत यांची एक दुर्मिळ मुलाखत व्हायरल होत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा काळ मराठी सिनेसृष्टीतील सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. या काळात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगांवकर या दिग्गजांनी एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ‘झपाटलेला’, ‘धुमधडाका’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘अफलातून’ असे कित्येक चित्रपट आजही तितक्याच आवडीनं पाहिले जातात. तर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही चरित्र भूमिका साकारत आपला एक वेगळा ठसा उमठवला आहे. (हे वाचा: Prajakta Mali-Rutuja Bagwe: काय सांगता? प्राजक्ता माळीची समलिंगी जोडीदार बनायला तयार ऋतुजा बागवे? स्वतः केलं उघड ) आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अफाट मोठा चाहतावर्ग आहे. लोक त्यांचे चित्रपट मोठ्या आवडीने पाहतात, आणि पोट धरून हसतात. आपल्या विनोदी अभिनयाने आणि अतरंगी हावभावाने लक्ष्मीकांत यांनी प्रेक्षकांना आपलं वेड लावलं होतं. लक्ष्मीकांत यांनी फारच लवकर जगाचा निरोप घेतला. त्यामुळे लोकांना त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत फारशा गोष्टी माहिती नाहीयेत. चाहते आजही त्यांच्या मुलाखती आणि जुने व्हिडीओ शोधण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु फारच कमी प्रमाणात त्यांच्या व्हिडीओ मुलाखती आढळतात.
दरम्यान आता सोशल मीडियावर लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांचा एक दुर्मिळ व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ‘जोडी नं १’ या कार्यक्रमातील असल्याचं लक्षात येत आहे. या व्हिडीओमध्ये मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस लक्ष्मीकांत आणि प्रियांना एकमेकांबाबत प्रश्न विचारताना दिसून येत आहे. लक्ष्मीकांतसुद्धा मजेशीर अंदाजात उत्तरे देताना दिसून येत आहेत.
यावेळी रेशम टिपणीसने लक्ष्मीकांत यांना विचारलं होतं, ‘तुम्ही प्रियांना दिलेलं पहिलं गिफ्ट कोणतं? यावर उत्तर देत लक्ष्मीकांत म्हणतात, मी खूप गिफ्ट दिले आहेत. यावर रेशम म्हणते, असं नाही पहिलं कोणतं होतं ते सांगा…. यावर लक्ष्मीकांत म्हणतात, ‘मी प्रियाला पहिलं गिफ्ट म्हणून साडी दिली होती’. लक्ष्मीकांत यांची ही दुर्मिळ मुलाखत सध्या प्रचंड चर्चेत आली आहे.