मुंबई, 19 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बस हा कार्यक्रमावर अल्पावधीत हिट झालाय. महाराष्ट्राच्या राजकारणातील स्त्रियांनी बस बाई बसच्या मंचावर हजेरी लावत कार्यक्रमाला चार चांद लावले. अमृता फडणवीस, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांनी कार्यक्रमात धमाल उडवून दिली. त्यानंतर अभिनेत्री श्रृती मराठे, अनिता दाते या अभिनेत्रीनींही कार्यक्रमात हजेरी लावली. कार्यक्रम फार कमी वेळात प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. कार्यक्रमाच्या या आठवड्याच्या भागाचा एक प्रोमो प्रदर्शित झाला असून या आठवड्यात अभिनेत्री क्रांती रेडकर सहभागी झाली आहे. क्रांती आणि क्रांतीच्या धम्माल किस्स्यांनी कार्यक्रमाला वेगळी रंगत येणार आहे. बस बाई बसच्या प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये क्रांतीनं थेट ‘लंडनची राणी आमची आज्जी’ असल्याचं सांगितलं आहे. तिच्या या वाक्यावर कार्यक्रमात सगळ्यांमध्ये एकच हशा पिकला आहे. लंडनची राणी क्रांतीची आज्जी कशी काय असा प्रश्न आता कार्यक्रमाचा प्रोमो पाहून सगळ्यांना पडला आहे. हे जाणून घेण्यासाठी बस बाई बसचा या आठवड्यातील एपिसोड पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. हेही वाचा - Pankaja Munde: ‘त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…’; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक आता लंडनच्या राणीची काय गडबड आहे हे सांगताना क्रांतीनं प्रोमोमध्ये पुढे म्हटलं आहे. लंडनची राणी आमची आज्जी आहे असा आमचा खेळ आहे. आणि आम्ही लंडनला गेल्यावर तिला हाक मारतो. आमचा मित्र पुष्कर श्रोत्री बकिंगम पॅलेसच्या खाली जाऊन पुष्कर श्रोत्री ये आज्जी अशी जोरात हाक मारतो. तो कशी हाक मारतो याची भन्नाट अँक्टिंगही क्रांतीनं करुन दाखवली आहे.
बस बाई बसच्या या मंचावर क्रांतीला आणखी एक खास सप्राइज मिळणार आहे. मंचावर क्रांतीचा ऑनस्क्रिन हिरो म्हणजे अभिनेते भरत जाधव हजेरी लावणार आहेत. भरतला पाहून क्रांती भलतीच खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. क्रांती आणि भरत त्यांच्या एव्हरग्रीन कोंबडी पळाली या गाण्यावर डान्स देखील करताना दिसणार आहेत. ‘जत्रा’ या प्रसिद्ध सिनेमात भरत आणि क्रांती यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. भरत आणि क्रांतीचं सिनेमातील कोंबडी पळाली हे गाणं तुफान गाजलं होतं. आजही या गाण्याचा वेगळा चाहता वर्ग आहे. क्रांतीच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झालं तर, क्रांतीनं आता निर्माती म्हणून काम करण्याचं ठरवलं आहे. काकण सिनेमानंतर क्रांती रेडकर निर्मित रेनबो सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.