मुंबई, 03 जुलै: मराठमोळा शिव ठाकरे सध्या हिंदीमध्ये चांगलाच नाव कमावत आहे. वेगवेगळ्या शो मधून शिव ठाकरे घराघरात पोहचला. ‘बिग बॉस 16’ फेम शिव ठाकरे शो संपल्यानंतरही चर्चेत आहे. बिग बॉस 16 नंतर शिव ठाकरेचा चाहतावर्ग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर शिव टीव्हीच्या लोकप्रिय स्टंट शो ‘खतरों के खिलाडी सीझन 13’ चा देखील एक भाग आहे. सध्या या शो मध्ये पण तो हिट होतोय. रोहित शेट्टीच्या या शो मध्ये तो कठीणात कठीण स्टंट करत प्रेक्षकांचं मन जिंकतोय. पण आता त्याच्याविषयी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ‘खतरों के खिलाडी’ च्या सेटवर स्टंट करताना शिवला दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये ‘खतरों के खिलाडी 13’चे शूटिंग जोरात सुरू आहे. टीव्ही, बॉलीवूड आणि म्युझिक इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी यावेळी स्पर्धक म्हणून शोमध्ये पोहोचले आहेत. या शोमध्ये प्रत्येकाला धोकादायक आणि तितकेच खतरनाक स्टंट्स करावे लागतात. यादरम्यान हे स्पर्धक स्टंट करताना जखमीही होत आहेत. आता याच यादीत शिवचं नाव देखील सामील झालं आहे. ‘खतरों के खिलाडी 13’ मध्ये स्टंट करताना त्याला दुखापत झाली आहे.
नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये ‘बिग बॉस 16’ चा स्पर्धक शिव ठाकरे हाताला झालेली जखम दाखवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या बोटांना टाके टाकल्याचे देखील दिसत आहे. शिव ठाकरेने बोटांचा क्लोजअप दाखवला आहे, जिथे अनेक टाके दिसतात. शिव ठाकरेने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे ज्यात प्रत्येकजण त्यांना झालेली दुखापत दाखवत आहे. याआधी अर्चना गौतमही शोमध्ये जखमी झाली होती. तिच्या मानेला टाके पडले होते. आता शिवचा हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. अनेक जण त्याला खतरों के खिलाडी 13 चा विजेता म्हणत त्याचं कौतुक करत आहेत. बॉलिवूडमधून अचानक गायब झाली ‘वीराना’ फेम अभिनेत्री; आता फिल्मी दुनियेपासून दूर करते हे काम या सीझनमध्ये शिव ठाकरे आणि अर्चना गौतम व्यतिरिक्त डेझी शाह, शीझान खान, ऐश्वर्या शर्मा, अंजली आनंद, अंजुम फकीह, रुही चतुर्वेदी आणि अनेक स्टार्स रोहित शेट्टीच्या या शोमध्ये खतरनाक स्टंट्स करण्यासाठी सहभागी झाले आहेत. शोच्या शूटिंगदरम्यान अनेक जण जखमी झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.
शिवबद्दल सांगायचं तर या शो सोबतच शिव नुकताच शिव ‘एमटीव्ही रोडीज’ मध्येही दिसला होता. ‘कर्म या कांड’ या थीमवर आधारित या नवीन सीझनमध्ये शिव गँग लीडर म्हणून सहभागी झाला होता. शिव ठाकरेची सुरूवात रोडीज मधूनच झाली होती. आता ‘ऑडिशन ते गेस्ट गँग लीडर’ असा प्रवास चाहत्यांना प्रभावित करणारा आहे. त्याची प्रगती पाहून त्याचे चाहते भारावले आहेत. आता शिवचं बिग बॉसच्या १६ व्या सीझनचं विजेतेपद थोडक्यात हुकलं असलं तरी तो ‘खतरों के खिलाडी’ चा विजेता व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.