मुंबई, 2 एप्रिल- अभिनेत्री केतकी चितळे अभिनयापेक्षा तिच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. मध्यंतरी तिला शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह विधानावरून अटक करण्यात आली होती. त्यावेळी देखील केतकी चितळेचं नाव चांगलच चर्चेत आलं होतं. आता केतकी चितळेनं एक अशी पोस्ट केली आहे, ज्यामुळं ती पुन्हा चर्चेत आलं आहे. सर्वांचं लक्ष तिच्या या पोस्टनं वेधलं आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या केतकी चितळेनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. तिनं तिचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की,मी आजही न्यायासाठी लढत असले तरी मी कायम सत्यच बोलत राहीन. मी जामिनावर बाहेर असले तरी तुम्ही नवीन काही कट रचून माझ्यावर नवीन केसेस लावू शकता (म्हणजे त्यात नवीन काय आहे, तुम्ही गेली 7 वर्षे तेच करत आहात). तुम्ही माझ्याबद्दल खोट्या बातम्या तयार करू शकता. पण मी थांबणार नाही. गप्प राहून मारण्यापेक्षा सत्य बोलून माझा खून झाला तरी चालेल' अशी पोस्ट केतकीने केली आहे.
वाचा-NMACC मध्ये अंबानी कुटुंबाचा शाही अंदाज; अनंत-राधिकाच्या जोडीने वेधलं लक्ष
केतकी एवढ्यावर थांबलेली नाही ती पुढे या पोस्टाला कॅप्शन देत म्हणते की, 'सत्य धोकादायक असल्याने अनेकांना ते ऐकायला किंवा वाचायला आवडत नाही. सत्य आणि खोटेपणा लपवण्यासाठी ते एखाद्याचा जीवही घ्यायला मागेपुढे बघत नाहीत.एखाद्या अपघातात किंवा संशयास्पदरित्या माझ्या मृत्यू झाला, किंवा माझ्या निधनाचं कारण प्रमाणाबाहेर औषधे अथवा गळफास घेतल्याचं असेल तर माझा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या केल्याने झालेला नसेल.मी आत्महत्येसारख्या प्रसंगाला लढा दिलेली मुलगी आहे. त्यामुळे मी पुन्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही.
त्यामुळे यावेळी आत्महत्या केल्याने माझा मृत्यू होणार नाही.त्यामुळे माझ्या मृत्यूची बातमी आली तर यामागील सत्य तुम्हाला ठाऊक असेल.जय हिंद! वंदे मातरम्! भारत माता की जय!'केतकीच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय, अशी चर्चा आता रंगली आहे. तिची ही पोस्ट नेमकी कशासाठी आहे, या प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
केतकी कायम वादात
केतकी चितळे हिने अनेकदा वादग्रस्त टिप्पण्या करून वाद ओढवून घेतले आहेत. नवबौद्धांसंदर्भातील टिप्पणीप्रकरणी तिच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल झाली होती. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हाही दाखल झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून तिने वाद ओढवून घेतला होता. महेश टिळेकर यांनीही केतकी चितळे हिला एका आक्षेपार्ह पोस्टचबद्दल चांगलंच सुनावलं होतं. मात्र केतकी चितळे हिच्या पोस्ट नेहमीच वादात राहिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Entertainment, Marathi entertainment