मुंबई, 30 ऑगस्ट- बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी कार्तिक आर्यनची ओळख आहे. कार्तिक आर्यन सध्या आपल्या जबरदस्त अभिनयानं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्याच्या ‘भूल भुलैया 2’ ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रेम आणि प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. सध्या कार्तिकचे चाहते त्याच्या आगामी ‘शहजादा’ चित्रपटाची वाट पाहात आहेत. तत्पूर्वी अभिनेत्यानं आपल्या कृतीनं पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकलं आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, कार्तिकला पान मसाल्याच्या जाहिरातीची ऑफर येताच त्याने ती करण्यास नकार दिला आहे. या रिपोर्टमध्ये एका अॅड गुरुच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की, ही गोष्ट अगदी खरी आहे. कार्तिकला अशा जाहिरातीची ऑफर मिळाली होती. ही ऑफर तब्बल 9 कोटींची होती. परंतु त्याने ती लगेचच नाकारली आहे. दरम्यान सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी कार्तिक आर्यनच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले की, पान मसाला जाहिरात करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि कायद्याने सेन्सॉर बोर्डालाही तसं करण्यास मनाई आहे. याआधी अक्षय कुमार पान मसाल्याच्या जाहिरातीतही दिसला होता, त्यानंतर त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. यामुळे त्यांनी लोकांची माफीही मागितली होती. **(हे वाचा:** न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहची पोलिसांकडून 2 तास चौकशी; विचारले ‘हे’ महत्त्वाचे प्रश्न ) कार्तिक आर्यनने तब्बल 9 कोटींची ऑफर नाकारुन प्रेक्षकांना खुश केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अभिनेत्याचं प्रचंड कौतुक होत आहे. हा निर्णय घेत कार्तिक आर्यनने साऊथ अभिनेत्यांच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. यापूर्वी साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि केजीएफ स्टार यशने अशा कोट्यावधींच्या ऑफर नाकारत सर्वांनाच थक्क केलं होतं. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने हा निर्णय घेतल्याने त्याचे चाहते आनंदीआहेत .