मिलिंद गवळींची जयंत सावरकरांसाठी लिहिलेली जुनी पोस्ट व्हायरल
मुंबई, 24 जुलै- मराठी तसेच हिंदी नाटक सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते जयंत सावरकर यांनी वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं. ते मागच्या काही दिवसापूर्वी आई कुठे काय करते मालिकेत दिसले होते. आता त्यांच्या जाण्यानंतर आई कुठे काय करते मधील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळी यांनी जयंत सावरकरांविषयी केलेली जुनी पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय होती मिलिंद गवळी यांची पोस्ट? जयंत सावरकर यांनी ‘आई कुठे काय करते’ मालिकेत तात्या मामांची भूमिका केली. अगदी गेल्या काही भागातच जयंत सावरकर आई कुठे काय करते मालिकेत दिसले होते. त्यानिमित्ताने आई कुठे काय करते मधील मिलिंद गवळींची एक जुनी पोस्ट व्हायरल होते आहे. मिलिंद गवळी फोटो पोस्ट करुन म्हणाले होते की, अण्णा तू आमच्यासाठी एक प्रेरणा आहेस, वय फक्त एक आकडा आहे हे सांगण्याचा अधिकार फक्त तुम्हाला आहे.. अशी पोस्ट मिलिंद गवळींनी शेअर केली होती. नोकरी सोडून जयंत सावरकर यांनी पूर्णपणे नाटकातच काम करायचे जेव्हा ठरविले तेव्हा त्यांचे सासरे नटवर्य मामा पेंडसे यांनी नोकरी सोडण्याला विरोध केला, पण अभिनयाच्या कामासाठी पूर्ण पाठिंबा दिला. सावरकरांनी सासरेबुवांचा सल्ला मानला आणि श्रद्धा व निष्ठेने रंगभूमीची सेवा सुरू केली. वाचा-वय वर्षे 88 तरी नव्हतं कसंलच दुखणं, स्वत:ला फिट ठेवण्यसाठी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर नक्की करायचे तरी काय? सुरुवातीची बारा वर्षे सावरकर यांनी ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम केले. त्याच वेळी ते नोकरीही करत होते. नाटकाची आवड होतीच. हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहानसहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले. पुढे साहित्य संघाच्या नाट्य शाखेत त्यांचा प्रवेश झाला. साहित्य संघात होणाऱ्या सर्व नाटकांच्या प्रयोगांना त्यांची हजेरी असायची. साहित्य संघाच्या दरवाज्यावर उभे राहून ते तिकिटे कापत. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘किंग लिअर’ (सम्राट सिंह) या नाटकात त्यांना मा. दत्ताराम यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. नाटक फारसे चालले नसले तरी त्यांनी साकारलेल्या ‘विदूषक’ या भूमिकेचे कौतुक झाले.
अनंत दामले ऊर्फ नूतन पेंढारकर, केशवराव दाते, जयराम शिलेदार, मा. दत्ताराम, दादा साळवी, नानासाहेब फाटक, पंडितराव नगरकर, परशुराम सामंत, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, रमेश देव, राजा परांजपे, रामदास कामत, सुरेश हळदणकर, ते आजच्या पिढीतील अद्वैत दादरकर, मंगेश कदम यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे. कमलाकर सारंग, दामू केंकरे, भालचंद्र पेंढारकर या जुन्या दिग्दर्शकांबरोबर कामे केल्यानंतर अद्वैत दादरकर, चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम, समीर विद्वांस अशा नव्या पिढीतल्या दिग्दर्शकांबरोबरही त्यांनी कामे केली आहेत.100 पेक्षा जास्त मराठी आणि 30हिंदी चित्रपटात काम केलं.