Hruta Durgule
मुंबई, 21 सप्टेंबर : अभिनेत्री हृता दुर्गुळे अवघ्या महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाते. हृतासाठी 2022 हे वर्ष खूपच खास ठरलं. कारण यावर्षी तिचे ‘टाइपास 3’ आणि ‘अनन्या’ हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळाला. तर ‘मन उडू उडू झालं’ ही तिची मालिकाही खूप गाजली. दरम्यान 2022 हे वर्ष आणखी एका कारणामुळे हृतासाठी खास होतं, ते कारण म्हणजे तिचं लग्न. हृताने निर्माता प्रतिक शाहसोबत लग्न करत तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. तसेच हृता लवकरच आता ओटीटीवरही पदार्पण करणार आहे. एवढं सगळं एका वर्षात घडल्यावर हृता म्हणतेय कि तिने हे वर्ष एवढं खास असेल अशी अपेक्षाच केली नव्हती. सगळ्या गोष्टी सहजपणे घडत गेल्या. हृताने नुकतीच न्यूज 18 हिंदीला एक मुलाखत दिली आहे. त्यात तिने हा खुलासा केलाय. हृताने अलीकडेच तिचा तिसरा मराठी चित्रपट ‘कन्नी’ ची घोषणा केली आहे त्यासोबतच ती एका वेब सीरिजमध्ये देखील काम करणार आहे. याविषयी हृता म्हणते, “लोकडाऊन नंतर मी कुठल्याही गोष्टीचं नियोजन करणं बंद केलं आहे. या वर्षी जे काही घडले ते सर्व अनियोजित होतं.त्यानंतर आता मी फक्त प्रवाहासोबत वाहत जाण्याचा आणि प्रत्येक टप्प्याचा आनंद घेण्याचं ठरवलं आहे.” हेही वाचा - Raju srivastava Video: राजू श्रीवास्तव यांनी आधीच केला होता यमराजचा उल्लेख; मृत्यूनंतर ‘तो’ VIDEO VIRAL यावेळी हृताने प्रतीक सोबतच्या लग्नाविषयी देखील सांगितलं. एकाच इंडस्ट्रीतील जोडीदाराशी लग्न करण्याबद्दल बोलताना ती पुढे म्हणते, “ एकाच क्षेत्रातील जोडीदार असणं हे मला नक्कीच कामी आलं आहे. कारण आमच्या विचित्र शिफ्टच्या वेळा, टाईट वेळापत्रक असतं. शिवाय एखाद्या शूटला किती वेळ लागेल याची शाश्वती नसते. पण प्रतिकपण याच क्षेत्रात काम करतो म्हणून त्याला या सगळ्याचीही चांगली कल्पना आहे. म्हणून, मला घरी का आणि कसे समजावून सांगू याची काळजी करण्याची गरज नाही. तसेच माझी सासू (मुग्धा शाह) देखील एक अभिनेत्री आहे त्यामुळे तिला इंडस्ट्री कशी आहे हे चांगलं समजतं.’’
हृताला यावेळी प्रतिकसोबत काम करशील का असे विचारण्यात आले. त्याचे उत्तर तिने ‘नाही’ असे दिले. पुढे याचे स्पष्टीकरण देत ती म्हणाली, ‘‘आम्ही आयुष्यभर सोबत राहण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा सोबत काम न करण्याचा देखील ठरवलं आहे. सध्या मी एका चित्रपटात आणि वेब सीरिजमध्ये व्यस्त आहे. पण देवाच्या कृपेने जर एखादी चांगली स्क्रिप्ट आली तर आम्ही तेही करू. ज्यात प्रतीक दिग्दर्शन करेल आणि मी अभिनय करू शकेन.” हृता नऊ वर्षे टेलिव्हिजनशी निगडीत होती आणि ती त्याला कम्फर्ट झोन मानते. याबद्दल ती म्हणाली “टेलिव्हिजनने माझे घराघरात नाव पोहचवले. टीव्हीने मला माझे पहिले मराठी नाटक आणि माझा पहिला चित्रपटही दिला. या तीन माध्यमांमधून मी कधीही आवडतं माध्यम निवडू शकत नाही. पण आता, मला टेलिव्हिजनच्या पलीकडे जाऊन चित्रपटसृष्टी एक्सप्लोर करायची आहे.” येणाऱ्या काळात हृता अजिंक्य राऊत सोबत ‘कन्नी’ या सिनेमात झळकणार आहे तर महेश मांजरेकर याच्या ‘एका काळेचे मणी’ या वेबसीरिज मध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे.