मुंबई, 21 ऑगस्ट- बॉलिवूड कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी चित्रपट तर कधी जाहिराती यांमुळे ते वादात सापडतात. अभिनेता हृतिक रोशनसोबतसुद्धा असंच काहीसं झालं आहे. अभिनेता हृतिक रोशन सध्या आपल्या एका जाहिरातीमुळे अडचणीत सापडला आहे. अभिनेत्याच्या या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण. अभिनेता हृतिक रोशन नुकतंच एका जाहिरातीमध्ये झळकला होता. या जाहिरातीला सध्या विरोध केला जात आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोची ही जाहिरात आहे. या जाहिरातीवरुन हा वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. काय आहे नेमकं प्रकरण- हृतिक रोशनने नुकतंच झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीसाठी एक जाहिरात केली आहे. या जाहिरातीमध्ये हृतिक रोशन म्हणत आहे, मला भूक लागली होती त्यामुळे मी महाकालकडून थाळी मागवली. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराच्या नावावर जाहिरातीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे हृतिक रोशन अडचणीत सापडला आहे. या जाहिरातीमध्ये हृतिक विविध शहरांची नावे घेताना दिसून येत आहे. दरम्यान तो डिलिव्हरी बॉयशी संवाद साधताना दिसून येतो. सोबतच तो म्हणतो, ‘थाळी खाण्याची इच्छा झाली… उज्जैनमध्ये होतो त्यामुळे महाकालेश्वरकडून मागवली’. अभिनेत्याच्या या जाहिरातीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. **(हे वाचा:** Preity Zinta: प्रितीनं अमेरिकेत अशी साजरी केली गोकुळाष्टमी; पतीसोबत कृष्णाच्या भक्तीत रमली अभिनेत्री ) या सर्व प्रकरणावर महाकालेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांनीसुद्धा कडाडून विरोध केला आहे. या जाहिरातीवर आक्षेप घेत त्यांनी म्हटलंय, ‘संपूर्ण देशातच नव्हे तर उज्जैनमध्येसुद्धा अशा कोणत्याच थाळीची डिलिव्हरी केली जात नाही. याठिकाणी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराच्यासमोर विनाशुल्क भोजन दिलं जातं. त्यामुळे या कंपनीने जाहिरात करण्याआधी एकदा विचार करायला हवा होता’. सोबतच या फूड डिलिव्हरी कंपनी आणि अभिनेता हृतिक रोशनने माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान उज्जैन महाकाल समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी, हे प्रकरण आपल्या समोर आलं असून,आपण त्याचा तपास सुरु केला असून हा व्हिडीओ लोकांची दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलं आहे’.