मुंबई, 30 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushsnat Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाचा तपास आता एका वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणीही होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहेत. याकरता सीबीआय तपासाची गरज नाही. त्याचप्रमाणे भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी जे मुद्दे मांडले आहेत, ते त्यांनी प्रत्यक्ष लेखी स्वरुपात द्यावे, त्यावर विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी दिली आहे. न्यूज18 लोकमतशी बोलताना त्यांनी हे मुद्दे मांडले. दरम्यान भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सीबीआय चौकशीची मागणी जोर लावून धरली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी असे आरोप केले आहेत की, सुशांतने आत्महत्या नाही, तर त्याचा खून झाला आहे.
सुशांत सिंह राजपूतचा खून झाला असे सुब्रमण्यम स्वामी यांना का वाटते, हे स्पष्ट करणारे ट्वीट देखील त्यांनी केले आहे.
दरम्यान हे सर्व मुद्दे स्वामी यांनी गृहमंत्रालयाकडे लेखी स्वरूपात द्यावे अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे अंकिता लोखंडेला सुरक्षा देण्यात येणार असल्याच्या चर्चांबाबत देशमुख यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी बिहारमधील पाटणा पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंकिता लोखंडेने रियाबाबत सुशांतसह झालेल्या आपल्या संवादाचे मेसेज शेअर केलेत. (हे वाचा- कोण आहे श्रुती मोदी? सुशांतच्या मृत्यूप्रकरणी पाटणा पोलीस करणार चौकशी ) त्याचप्रमाणे आतापर्यंत 3 जणांची चौकशी बिहार पोलिसांनी केली आहे. यामध्ये सुशांतचा मित्र महेश शेट्टी, त्याचा कुक आणि त्याची बहिण मितू सिंहचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आत्महत्येच्या 2 दिवस आधी सुशांत आणि रियामध्ये भांडण झाल्याचा खुलासा मितूने तिच्या जबाबातून केला आहे.