'हीर रांझा' फेम प्रिया राजवंशचा थरकाप उडवणारा शेवट
मुंबई, 9 मे- बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलंय, तरीसुद्धा त्यांची लोकप्रियता प्रचंड होती. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे प्रिया राजवंश होय. ‘मिलो ना तुम तो हम घबरायें, मिलो तो आँख चुरायें’ हे गाणं 50 वर्षांनंतर आजही यूट्यूबवर 22 मिलियनहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. 1970 मध्ये आलेल्या दिग्दर्शक चेतन आनंद यांच्या ‘हीर रांझा’ या चित्रपटातील हे सुपरहिट गाणं आहे. याच गाण्यातील अभिनेत्री म्हणजे प्रिया राजवंश . पिवळा कुर्ता, गळ्यात सुंदर चकचकीत हार आणि दाट केसांवर पांढऱ्या फुलांचा गजरा माळलेली अभिनेत्री प्रिया राजवंश आजही प्रेक्षकांना लक्षात आहे. पडद्यावर एक काळ गाजवलेल्या या अभिनेत्रीचा खऱ्या आयुष्यातील शेवट मात्र फारच भयानक होता. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. 70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया राजवंशने आपल्या 22 वर्षांच्या करिअरमध्ये केवळ 7 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. प्रिया राजवंशचं खरं आयुष्यसुद्धा तिच्या ‘हीर-रांझा’ चित्रपटापेक्षा कमी नव्हतं. प्रिया राजवंशने सर्व चित्रपट तिच्या पतीसोबत केले आहेत. शिमल्यात जन्मलेल्या प्रिया राजवंशने आपलं शालेय शिक्षण इंग्लंडमधून पूर्ण केलं होतं. (हे वाचा: नेमकी कोण आहे The Kerala Story फेम अदा शर्मा? अभिनेत्रीची संपत्ती जाणून व्हाल थक्क ) प्रिया राजवंशला लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याचं वेड होतं. अशातच तिने बॉलिवूड अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.त्यासाठी अभिनेत्रीने विविध दिग्दर्शकांना आपले फोटो पाठवले होते. 60 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत नवनवीन कथांवर चित्रपट बनत होते. बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक चेतन आनंद यांनासुद्धा प्रियाचे फोटो मिळाले होते. चेतन आनंदना प्रियाचे फोटो प्रचंड आवडले आणि त्यानी तिला आपल्या चित्रपटात काम देण्याचं ठरवलं. चेतन आनंदसोबतच्या पहिल्या भेटीनेच प्रिया राजवंशचं आयुष्यच बदलून गेलं होतं. प्रिया शिमल्याहुन मुंबईत आली आणि चेतन आनंद यांना भेटली. त्यावेळी 60 च्या दशकाचा मध्य चालू होता. पहिल्या भेटीतच चेतन आनंदने आपल्या चित्रपटात प्रिया राजवंशला कास्ट केलं होतं. या चित्रपटात धर्मेंद्र आणि बलराज साहनी मुख्य भूमिकेत होते. आणि प्रिया राजवंश अभिनेत्री बनली होती. हा चित्रपट 1964 मध्ये प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. चित्रपटातील सर्व गाणीही खूप लोकप्रिय झाली होती.इथूनच प्रियाच्या करिअरची यशस्वी सुरुवात झाली. दरम्यान, चेतन आपल्या आनंद पत्नी आणि मुलांपासून दुरावला होता.
अशातच शूटिंगदरम्यान त्यांची मैत्री प्रिया राजवंशशी झाली आणि बघता-बघत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी लग्न करुन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रिया राजवंशने पती चेतन आनंद यांच्याच केवळ 7 चित्रपटांमध्ये काम केलं आणि इतर कोणत्याही दिग्दर्शकासोबत चित्रपट केले नाहीत. चेतन आनंद यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून 2 मुले होती. या दोन्ही मुलांना प्रिया आवडत नव्हती. चेतन आनंद यांचे वयाच्या 82 व्या वर्षी म्हणजेच 6 जुलै 1997 रोजी निधन झालं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र उघड करण्यात आलं तेव्हा असे आढळून आले की, चेतन आनंदने आपली निम्म्याहून अधिक संपत्ती प्रिया राजवंशला दिली होती.
वडिलांच्या या निर्णयाने चेतन आनंद यांची मुले विवेक आणि केतन आनंद प्रचंड रागात होते. दुर्दैव म्हणजे संपत्तीसाठी या दोन्ही मुलांनी प्रियाच्या हत्येचा कट रचला आणि माला चौधरी आणि अशोक चिन्नास्वामी या दोन नोकरांच्या मदतीने 27 मार्च 2000 रोजी अभिनेत्रीची निर्घुर्ण हत्या केली. हत्येच्या बरोबर दोन वर्षांनंतर पोलिसांनी त्याचा संपूर्ण खुलासा करुनआरोपींना अटक केली. सूडाच्या भावनेने प्रिया राजवंशच्या आयुष्याचा वेदनादायक अंत झाला. प्रिया राजवंशचं जीवापाड प्रेमच त्यांच्या हत्येचं कारण ठरलं.