मुंबई, 18 मे- दक्षिण आशियातील बहुतेक देशांमध्ये सध्या उन्हाळा (Summer) ऋतू सुरू आहे. या वर्षीचा उन्हाळा गेल्या काही दशकांमधील सर्वांत उष्ण उन्हाळा (Hottest Summer) ठरत आहे. भारतामध्ये काही भागांत तर गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू आहे. भारताचा (India) शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमध्येही (Pakistan) अशीच स्थिती आहे. ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्सनुसार (Global Climate Risk Index), पाकिस्तान हा हवामान बदलाच्या (Climate Change) बाबतीत आठव्या क्रमांकाचा असुरक्षित देश आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) निर्माण झाली आहे. अनेक भागांत तापमान 48 अंशांच्या पार गेलं आहे तर काही ठिकाणी पारा 51 अंशांवर आहे. अचानक विजेची मागणी वाढल्यानं वीज यंत्रणाही अपयशी ठरली आहे. एकूणच, पाकिस्तान सध्या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. उष्णतेमुळे अबोटाबादच्या जंगलात (Abbottabad) भीषण आग (Wild Fire) लागली आहे. अशा कठीण काळात मदत करण्याऐवजी एका पाकिस्तानी टिकटॉक स्टारनं (TikTok) आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या जंगलात आपला व्हिडिओ बनवला आहे. हुमैरा असगर (Humaira Asghar) असं या टिकटॉक स्टारचं नाव आहे. जंगलात लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर स्वत:चा व्हिडिओ शूट करणं तिला चांगलंच महागात पडलं आहे. सोशल मीडियावर नेटिझन्सनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. दैनिक भास्करनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पाकिस्तानी टिकटॉक स्टार हुमैरा असगरनं अबोटाबादमधील जळत्या जंगलातील एक व्हिडिओ (Humaira Asghar Video) पोस्ट केला आहे. ‘मी जिथे जाते तिथे आग लागते,’ असं कॅप्शन तिनं या व्हिडिओला दिलं आहे. तिचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही नेटिझन्सनी तिच्यावर जंगलात आग लावण्याचा आरोप केला आहे. इस्लामाबाद वन्यजीव व्यवस्थापन मंडळाच्या (Islamabad Wildlife Management Board) अध्यक्षा रीना सईद खान यांनीही हुमैरावर टीका केली आहे. ‘व्हिडिओमध्ये आगीला ग्लॅमराईज करण्याऐवजी ती शांत करण्यासाठी पाण्याची बादली ठेवणं गरजेचं होतं,’ असं रीना म्हणाल्या आहेत.
काही सोशल मीडिया यूजर्सच्या मते, हा व्हिडिओ म्हणजे वेडेपणा आहे. एका यूजरनं लिहिलं आहे, ‘या व्हिडिओतून जो मेसेज मिळत आहे तो खूपच धोकादायक आहे.’ तर, आणखी एका यूजरनं हुमैराच्या या कृतीला मूर्खपणा आणि वेडेपणाची उपमा दिली आहे. सोशल मीडियावर होत असलेली टीका लक्षात घेता हुमैराच्या मॅनेजरनं याबाबत स्पष्टीकरण दिलं. हुमैरानं आग लावलेली नाही. अगोदरच लागलेल्या आगीच्या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यात काहीही गैर नाही, असं तिचा मॅनेजर म्हणाला. मात्र, तरीही टीका नं थांबल्यानं शेवटी हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला.सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारची बेजाबदार वर्तणूक टाळली पाहिजे, असं लोकांचं म्हणणं आहे.