मुंबई, 4 जून : झी मराठीवर 2015 मध्ये सुरू झालेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेनं सर्वांची मनं जिंकली होती. कोणताही सस्पेन्स नसलेली आणि रोजचे हलके फुलके विषय हाताळत सुरू केलेली ही मालिका प्रचंड गाजली. यात अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, पुष्कराज चिपळूणकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. या मालिकेतील प्रत्येक पात्र तसं लक्षात राहणारं होतं. मागच्याच वर्षी या मालिकेतील सखी गोखले आणि सुव्रत जोशी लग्नाच्या बेडीत अडकले त्यानंतर आता या मालिकेतली आणखी एका अभिनेत्रीनं लॉकडाऊनमध्येच लग्न उरकलं आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’मध्ये किंजलचं पात्र सर्वांच्या लक्षात आहे. ही किंजल म्हणजेच अभिनेत्री सुवेधा देसाई नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’नंतर सध्या ती वैजू नंबर 1 या मालिकेतही काम करत आहे. या मालिकेत तिनं कानडी भूमिका साकारली आहे. सुवेधाचा फेब्रुवारी महिन्यात सागर गवाणकरशी साखरपुडा झाला होता.
सुवेधा आणि सागर मे महिन्याच्या अखेरीस लॉकडाऊनमध्येच अगदी मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
सुवेधाचा नवरा सागर गवाणकर मराठी सिनेसृष्टीतील चांगला लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो.
या दोघांनी अगदी साध्या पद्धतीनं लग्न उरकलं. कुटुंबीय आणि मोजक्या मित्रमंडळींनी त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. सुवेधानं तिच्या सोशल मीडियावरून लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. वाचा-फक्त 60 सेकंदांमध्ये 10 घरांवर कोसळलं वडाचं झाड, पाहा थरारक Live Video वाचा-2 महिन्यांनी पुन्हा उघडणार शॉपिंग मॉल्स; मात्र अनिवार्य असतील हे नियम