Deepa parab in Baipan Bhaari Deva
मुंबई, 18 ऑगस्ट : मराठीत सध्या एकामागोमाग एक धमाल चित्रपट प्रदर्शित होत आहेत. प्रेक्षकही बॉलिवूड चित्रपटाच्या मोहात न पडता मराठी चित्रपटाला धमाकेदार यश मिळवून देत आहेत. दरम्यानच्या काळात आलेले ‘पावनखिंड’ , चंद्रमुखी, ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव या सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केली. तसेच ‘दगडी चाळ २’, ‘टकाटक २’ हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. आता आणखी एका मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करत प्रेक्षकांना हि आनंदाची बातमी दिली आहे. प्रेक्षकांच्या मनातील भावना ओळखून तुमच्याआमच्या घरातील गोष्ट अगदी सहजपणे प्रेक्षकांसमोर मांडणारे दिग्दर्शक म्हणजेच केदार शिंदे. ते आता पुन्हा एकदा एक नवीन कलाकृती प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावरून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. ‘बाई पण भारी देवा’ असा हा चित्रपट असून येत्या ६ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठीतील आघाडीच्या नायिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
“बाईपण भारी देवा” या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, दिपा चौधरी, शिल्पा नवलकर या सहा अभिनेत्री या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत काम करताना दिसतील. या चित्रपटात अंकुश चौधरींची बायको दीपा परबसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिने अलीकडेच झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. आता ती या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर देखील झळकणार आहे. हेही वाचा - Aboli : ‘अबोली’ मालिकेत दहीहंडीची धूम; BTS व्हिडीओ होतोय VIRAL आई, आजी, बायको, मुलगी, बहिण, सासू, मावशी, काकी, आत्या यांना सांगा त्यांचा सिनेमा येतोय असं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. चित्रपटाचं हे मोशन पोस्टर पाहून ‘बाईपण भारी देवा’बाबात प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.हा चित्रपट म्हणजे ‘तुमच्या आमच्या घरातल्या सुपरवूमनची गोष्ट आहे’ असं मत केदार शिंदे यांनी सांगितलं होतं . ‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘एमव्हीबी मीडिया’ यांची निर्मिती असलेला हा पहिलाच आहे. ‘एमव्हीबी’ ची ही पाहिलीच निर्मिती असून माधुरी भोसले निर्मात्या आहेत. तर बेला शिंदे आणि अजित भुरे यांचा सह-निर्माते म्हणून सहभाग लाभला आहे. ‘बाई पण भारी देवा’च्या निमित्ताने केदार शिंदे काय नवीन घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण तुमच्या आमच्या आयुष्यातील आई, बहिणी, बायको, मैत्रीण अशा अनेक स्त्रियांची गोष्ट या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.