Shreya Bugade
मुंबई, 19 सप्टेंबर : झी मराठीवरील रिऍलिटी शो ‘बस बाई बस’ला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. या शोमध्ये सेलिब्रिटी, राजकारणी पाहुणे म्हणून येतात. विशेष म्हणजे, केवळ महिला सेलिब्रिटीच या शोमध्ये हजेरी लावतात. सुबोध भावेचं खुमासदार सूत्रसंचालन, आणि जोडीला महिलांची एक टीम या सेलिब्रिटींना एकाहून एक सरस प्रश्न विचारतात की सेलिब्रिटीही गोंधळून जातात. नुकतीच अभिनेत्री श्रेया बुगडेने या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या शो दरम्यान श्रेयाने आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत रंजक खुलासे केले. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातुन प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या श्रेयाला मात्र आयुष्यात एका गोष्टीची फार भीती वाटते. मग त्यावरून सुबोध भावेने तिची चांगलीच फिरकी घेतली. नुकतंच ‘बस बाई बस’चा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री-कॉमेडियन श्रेया बुगडेनं हजेरी लावली आहे. या मंचावर तिला ‘तू रात्री एकटी असताना कार्टून लावून का बसतेस’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर ती स्पष्टीकरण देत म्हणाली, ‘‘मला भुतांची खूप भीती वाटते. रात्री मी एकटी असले आणि कुठून काही आवाज आला तर मला खूप भीती वाटते. म्हणून मी कार्टून लावून बसते.’’ हे ऐकून सुबोधने तिची चांगलीच फिरकी घेतली. तो म्हणाला ‘रात्री भुतं कार्टूनच्या रूपात सुद्धा येऊ शकतात.’’
तो म्हणाला, ‘‘महेश कोठारेंच्या सिनेमात भूत बाहुल्याच्या रूपात आलं होतं. तसं तुझ्यासमोर येईल. तुला वाटेल ते कार्टून आहे पण ते भूत असू शकतं.’’ सुबोधचं बोलणं ऐकून श्रेया चांगलीच घाबरली, मात्र ‘बस बाई बस’ च्या मंचावर हशा पिकला. या भागात अनेक गमतीजमती घडल्या आहेत. हेही वाचा - Sai Tamhankar : बॉलिवूडच्या ‘सिरीयल किसर’ अभिनेत्यासोबत झळकणार मराठमोळी सई; नाव ऐकूण तुम्हालाही वाटेल आश्चर्य ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून श्रेया बुगडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. उत्तम कॉमेडी टायमिंग, आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने संपूर्ण महाराष्ट्राला आपली दखल घेण्यास भाग पाडलं. श्रेयाच्या कॉमेडीचे आणि तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. यशोमुळे श्रेयाला अफाट प्रसिद्धी मिळाली आहे. श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे बस बाई बसच्या मंचावर श्रेयाला बघून प्रेक्षक हा भाग बघण्यासाठी उत्सुक झाले आहेत.