मुंबई, 24 जुलै : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) गेल्या काही महिन्यांपासून अनेकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. सोनूने मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यापासून मुंबई पोलिसांना फेस शिल्ड देण्यापर्यंत अनेक वेळा मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान सोनू आता सोशल मीडियावर गेल्या एक दोन दिवसात व्हायरल झालेल्या ‘वॉरिअर आजीं’ची मदत करणार आहे. त्याने या संदर्भात ट्वीट देखील केले आहे. या आजीबाई कोरोनाच्या संकटात पोट भरण्यासाठी रस्त्यावर लाठीकाठीचं प्रात्यक्षिक दाखवत होत्या. या कठीण प्रसंगातही त्यांची जिद्द अनेकांच्या पसंतीस उतरल्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे. अभिनेता रितेश देशमुखने देखील या आजींचा व्हिडिओ शेअर केला होता. दरम्यान प्रसिद्ध नेमबाज असणाऱ्या आजी चंद्रो तोमर (ज्यांच्यावर सांड की आँख हा सिनेमा बनला आहे) यांनी देखील या ‘वॉरिअर आजीं’चा व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ रिट्वीट करत सोनूने या आजींना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (हे वाचा- WhatsApp देणार ही नवी सुविधा! वेगवेगळ्या फोनमध्ये वापरता येणार एकच नंबर) त्याने या आजीबाईंची सविस्तर माहिती देण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे मदतीची घोषणा देखील केली आहे. या ट्वीटमध्ये सोनू असे म्हणाला आहे की, ‘या आजींबरोबर एक प्रशिक्षण शाळा उघडायची आहे ज्याठिकाणी त्या देशातील महिलांना स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रशिक्षण देतील’
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या आजी पुण्यातील हडपसर याठिकाणच्या असून त्यांचे नाव शांताबाई पवार आहे. लॉकडाऊन मध्ये त्यांची आणि कुटुंबाची झालेली परवड थांबवण्यासाठी त्या स्वत: पैसे कमावण्यासाठी बाहेर पडल्या आहे. लहानपणापासून डोंबारी खेळ करणाऱ्या आजी या वयातही खेळ करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मदत मागत असल्याचा त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. (हे वाचा- अक्षय कुमारने ‘अतरंगी रे’च्या फक्त दोन आठवड्यांच्या शूटिंगसाठी घेतले ‘एवढे’ कोटी ) विशेष म्हणजे या आजींनी दोन सिनेमामध्येही काम केले आहे. मात्र परिस्थितीने पुन्हा त्यांना रस्त्यावर खेळ करायला भाग पाडले. मुली-नातवंडांसह 18 जणांच कुटुंब त्या सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. रितेश देशमुख, सोनू सूद यांसारखे अनेक जण या आजींच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.