मुंबई, 26 ऑगस्ट: टिक टॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचा 22 ऑगस्ट रोजी गोव्यात मृत्यू झाला. सोनाली यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांना गोवा पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी मोठी माहिती समोर आली असून या दोन्ही संशयित आरोपींनी कबुली दिली आहे. सोनाली फोगट यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला नसून त्यांना जाणूनबुजून ड्रग्ज देण्यात आले होते, अशी कबुली दोन्ही संशयित आरोपींनी दिली असल्याची माहिती गोवा IGP पोलिसांनी दिली आहे. सोनाली यांना ड्रग्जचा ओव्हरडोस झाला होता . ANI नं याबाबत वृत्त दिलं आहे. सोनाली फोगट यांच्या भावाने गोवा पोलिसांत सोनालीचा खुन झाल्याचा दावा करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींची चौकशी करत त्यांचा कबुली जबाब नोंदवून घेतला. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपलब्ध साक्षीदारांच्या मदतीनं, सीसीटीव्ही फुटेज पाहिले गेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनाली फोगट यांच्यावर दोन्ही संशयित आरोपी पार्टी करताना दिसत आहे, सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, दोघे सोनालीला जबरदस्ती काही तरी पाजण्याचा प्रयत्न करत आहेत. सोनाली यांच्या ड्रिंक्समध्ये ड्रग मिसळून त्यांना पाजण्यात आले, असंही गोवा पोलिसांनी सांगितलं आहे.
हेही वाचा -
Sonali Phogat: सोनाली मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट; गॊवा पोलिसांनी दोघांना केली अटक
दोन तास सोनाली होत्या बाथरुममध्ये गोवा पोलिसांनी केलेल्या खळबळजनक खुलास्यात त्यांनी पुढे म्हटलंय, सोनाली यांनी ड्रग्ज पाजल्यानंतर काही वेळात त्यांची स्वत:वरचा कंट्रोल सोडला. तेव्हा संशयित आरोपींनी त्यांना सांभाळलं. पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास जेव्हा सोनाली स्वत:ला सांभाळू शकत नव्हत्या तेव्हा दोघे त्यांना बाथरुमच्या दिशेने घेऊन जाताना दिसत आहेत. त्या जवळपास 2 तास बाथरुममध्ये होत्या. बाथरुममध्ये दोघांनी सोनाली यांच्याबरोबर काय केलं याचं स्पष्टीकरण अद्याप आरोपींनी दिलेलं नाही. पाहा सोनाली फोगट यांचा तो सीसीटीव्ही व्हिडीओ
हेही वाचा - Sonali Phogat: सोनालीच्या मृत्यूनंतर अशी झालीये लेकीची अवस्था; रडून-रडून आईसाठी मागतेय न्याय गोवा पोलिसांच्या चौकशीत आतापर्यंत हाती लागलेल्या पुराव्यांनुसार, दोन्ही आरोपी गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. गोवा पोलीस या प्रकरणात आणखी तपास करत आहेत. सोनाली फोगट यांच्या शरीरावर काही बोथट जखमांच्या खुणा आढळण्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं. आरोपींनी दिलेल्या कबुलीत त्यांनी सोनाली यांचा मृतदेह उचलताना त्यांच्या शरीरावर या जखमा झाल्याचं म्हटलं आहे. सोनालीच्या भावाने केले धक्कादायक दावे सोनालीच्या भावानं गोवा पोलिसात धाव घेत धक्कादायक दावे केले होते. त्यांनी सांगितलं, ‘सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांनी मिळून माझ्या बहिणीला जाळ्यात अडकवलं. सुखविंदरने तीन वर्षांपूर्वी सोनालीच्या जेवणात अंमली पदार्थ मिसळून तिच्यावर बलात्कार केला होता आणि त्याचा व्हिडिओही बनवला होता. त्यानंतर सुधीर आणि त्याचा मित्र सुखविंदर सातत्यानं सोनालीला ब्लॅकमेल करत होते. हे दोघं अधूनमधून सोनालीच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळत होते. त्यामुळे अनेकदा तिची प्रकृती बिघडली होती. शेवटी या दोघांनी मिळून कट करत गोव्यात नेऊन तिची हत्या केली’.