अंकिता लोखंडेने शेअर केले पवित्र रिश्ताच्या सेटवरील अँटोल्ड किस्से
मुंबई, 11 मे- छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘पवित्र रिश्ता’ होय. पवित्र रिश्ता मालिकेची लोकप्रियता तुफान होती. या मालिकेतील अर्चना आणि मानव अर्थातच अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. टीव्हीचा लोकप्रिय चेहरा असणाऱ्या अंकिता लोखंडेने ‘पवित्र रिश्ता’ मधूनच आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. अंकिता लोखंडेला या मालिकेतून खूप यश मिळालं होतं. ‘पवित्र रिश्ता’ची अर्चना म्हणून ही अभिनेत्री घराघरात प्रसिद्ध झाली आहे. अंकिता लोखंडेने ‘पवित्र रिश्ता 2.0’ आणि ‘झलक दिखला जा 4’सह अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. इतकंच नव्हे तर अंकिताने बॉलिवूडमध्येही आपलं नशीब अजमावलं आहे. अंकिता लोखंडेने कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती ‘बागी 3’ चित्रपटात दिसली होती. मात्र, या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेत्री सहाय्यक भूमिकेत झळकली होती. आता बऱ्याच दिवसांपासून ही अभिनेत्री पडद्यावरुन गायब आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता लोखंडेने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याची व्यथा सर्वांसमोर मांडली होती. तिचे चाहते टिळक पुन्हा एकदा चांगल्या प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी आतुर आहेत. (हे वाचा: Spruha Joshi Husband: अभिनेता-नेता नव्हे पत्रकाराच्या प्रेमात पडलेली स्पृहा जोशी; भन्नाट आहे मराठी नायिकेची Love Story ) दरम्यान नुकतंच ही अभिनेत्री ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये दिसली होती. टीव्ही क्वीन अंकिता लोखंडे, दिव्यांका त्रिपाठी, अनिता हसनंदानी आणि उर्वशी ढोलकिया ‘द कपिल शर्मा’ शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान कॉमेडी किंग कपिल शर्माने टीव्ही मालिकांच्या शूटिंगबद्दल बोलताना सांगितलं होतं की, टीव्ही अभिनेत्रींना तासनतास शूटिंग करावं लागतं. चित्रपटांपेक्षा मालिकांसाठी जास्त काम करावं लागतं. अनेकवेळा सतत एकसारखं शूटिंग करुन कलाकार आजारीसुद्धा पडतात. कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर अंकिता लोखंडेने आपल्या पहिल्या ‘पवित्र रिश्ता’ मालिकेशी संबंधित अनेक खास क्षण शेअर केले आहेत. अभिनेत्रीने सांगितलं की, एकदा तिला मालिकेत लग्नाचा सीन शूट करण्यासाठी 148 तास शूट करावं लागलं होतं. अभिनेत्री म्हणाली, “मला मालिकेतील लग्नाच्या सीनसाठी नऊवारी साडी नेसावी लागली आणि मी सलग 148 तास शूटिंग करत होते. त्या दिवसांत आम्ही सेटवरच झोपायचो. पण मला ते दिवस आजही चांगलेच आठवतात.
अंकिता पुढे म्हणाली, “हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता आणि पवित्र रिश्तामधून मी खूप काही शिकले आहे. त्यावेळी गणेशोत्सव सुरु होता आणि मी नुकतंच मालिकेत काम करायला सुरुवात केली होती. मला दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात जायचं होतं आणि त्यावेळी खूप गर्दी होती. पण लोकांनी मला सांगितलं की, ते मला दर्शनासाठी मदत करतील, पण त्यांना माझ्यासोबत फक्त एक फोटो हवा आहे. त्यावेळी मला असं वाटलं की, मी प्रसिद्ध झाले आहे’. असं म्हणत अंकिताने आठवणींना उजाळा दिला आहे.