मुंबई, 11 मे- राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. कधी राजकीय पोस्ट तर कधी मनोरंजन क्षेत्राशी निगडित पोस्ट ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे आगामी प्रोजेक्ट तसेच काही सामाजिक उपक्रम याबद्दलची माहिती ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असतात.तसेच ते खासदार म्हणून सतत विविध भागांना भेटी देत असतात. भेटीदरम्यानचे किस्से आणि घडामोडी ते चाहत्यांपर्यंत आणि आपल्या कार्यकर्त्यांबद्दल पोहोचवत असतात. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतंच सोलापूर दौरा केला होता. छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास मांडणारे महानाट्य-शिवपुत्र संभाजी पंढरपूर याठिकाणी सादर करण्यात आलं. त्यांनतर अमोल कोल्हे यांनी आजूबाजूच्या ठिकाणांनाही भेटी दिल्या. तेथील लोकांची विचारपूसदेखील केली. यादरम्यान अनेक लोकांनी त्यांच्याशी संवाद साधला. काल त्यांनी एक पोस्ट करत आपल्याला एका ताईने राखी बांधत कसा आपल्यावर एका मोठ्या भावासारखा विश्वास दाखविला आणि जबाबदारी दिली हे शेअर केलं होतं. त्यांनतर आज अमोल कोल्हे यांनी आणखी एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. नुकतंच त्यांनी इन्स्टावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये एक शाळकरी मुलगा त्यांना त्यांचं पोर्ट्रेट देताना दिसत आहे. या दहावीत शिकणाऱ्या मुलाने स्वतः आपल्या हाताने हे सुंदर पोर्ट्रेट बनविलं आहे. डॉ. अमोल कोल्हे हे सुंदर पोर्ट्रेट पाहून भारावून गेले होते. डॉ. अमोल कोल्हे यांची इन्स्टा पोस्ट- सोलापूरच्या सुहास थ्वंते या दहावीत शिकणाऱ्या युवक मित्राने स्वतः माझं हे सुरेख चित्र रेखाटून मला भेट दिलं! एखाद्या कसलेल्या चित्रकारानं काढलंय असं वाटावं इतक्या बारकाव्यांसह व सफाईदारपणे हे चित्र त्याने काढलंय. त्याच्या या अप्रतिम कलाकारीचे मनापासून कौतुक आहे! सुहास, धन्यवाद मित्रा!
स्टार प्रवाहवरच्या ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. अमोल कोल्हे यांनी कही दिवसांपूर्वी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत शिवरायांची भूमिका साकारली होती. तसंच ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या झी मराठीवरच्या मालिकेतून त्यांनी संभाजी महाराजांचं कार्य घराघरात पोहोचवलं होतं. अमोल कोल्हे अभिनयासोबत राजकीय क्षेत्रातही कार्यरत आहेत. ते सध्या राष्ट्रावादीकडून शिरूर मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. याआधी ते शिवसेनेत होते.