मुंबई, 09 एप्रिल : कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे देशभरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी पोलीस कर्मचारी, पालिकेचे अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, काही एनजीओ, स्वयंसेवक, सरकारी अधिकारी इ. सर्वच जण दिवसरात्र काम करून कोरोनाशी लढाई लढत आहेत. आपण घराबाहेर न पडणं हेच त्यांना मदत केल्यासारखं आहे. मात्र आपल्यासाठी, आपल्या देशासाठी काम करणाऱ्या या खास ‘आर्मी’ला निदान मनापासून धन्यवाद तरी म्हणूच शकतो, असं आवाहन अभिनेता अक्षय कुमार (Akshay kumar) याने केलं आहे. (हे वाचा- रिमेकचा अट्टहास कशासाठी? फक्त फॅन्सच नाही तर मसक्कली 2.0 वर भडकले ए. आर. रेहमान ) अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने सांगितलं की, मुंबई पोलिसात काम करणारा त्याचा एक अधिकारी मित्र त्याला म्हणाला की ‘तुम्हाला घरातून बाहेर पडायला भिती वाटतेय आणि आम्हाला घरी जायला. कारण आम्ही दिवसभर घराबाहेर असतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारे विषाणूचा त्रास आमच्या कुटुंबाला व्हायला नको. त्यामुळे आम्ही 10-10 दिवस घरीच नाही जात आहोत.’ मित्राने ही गोष्ट सांगताच अक्षय एकदम अवाक झाला. त्यामुळेच त्याने या सर्व ‘कोरोना कमांडो’ना अभिवादन करण्याचं आवाहन केलं आहे. फक्त पोलीसच नाही तर पालिकेचे अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, काही एनजीओ, स्वयंसेवक, सरकारी अधिकारी, किराणा विकणारे दुकानदार, तुमच्या इमारतीचा वॉचमन इ. सर्वांचे आभार मानण्याचं आवाहन त्याने केले आहे
लगेच त्याने दुसरं ट्वीट शेअर करत या सर्व कोरोना कमांडोंप्रती धन्यवाद व्यक्त केला आहे. त्यांने आधीच्या व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे नाव आणि शहर लिहून आणि #DilSeThankYou असा हॅशटॅग वापरत कृतज्ञता व्यक्त करण्याचं आवाहन त्याने केले आहे. #DilSeThankYou ची ही मोहीम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूड कलाकार त्यांंच्या चाहत्यांना वेळोवेळी आवाहन करत आहेत. अक्षय देखील सोशल मीडियावर याबाबत व्यक्त झाला आहे. दरम्यान अक्षय कुमारने पीएम केअर्स फंडमध्ये 25 कोटींची मदत देखील केली आहे. संपादन- जान्हवी भाटकर