बॉईज 3
मुंबई, 15 ऑक्टोबर : मराठी चित्रपटसृष्टीत 2017 आणि 2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बॉईज’ ‘बॉईज २’ ला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले होते. त्यानंतर बॉईज ३ या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. एकीकडे बॉलिवूडचे मोठे चित्रपट यश मिळण्यासाठी धडपडत असताना या मराठी चित्रपटाला प्रेक्षकानी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटातील धैर्य, ढुंग्या आणि कबीर यांचे त्रिकूट आणि त्यांच्या आयुष्यात येणारी कानडी मुलगी यांची धमाल मस्ती पडद्यावर पाहायला मिळाली. नुकतेच या चित्रपटाचे यश साजरे करण्यात आले. त्यात चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे. विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’, ‘बॉईज 2’ ला जसा प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तसेच प्रेम प्रेक्षकांनी ‘बॉईज 3’ लाही दिले. ‘बॉईज 3’ मधील ढुंग्या, धैर्या आणि कबीरची धमाल यात तिप्पट पटीने वाढली. यात त्यांना साथ दिली ती कीर्तीने. बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमावणाऱ्या ‘बॉईज 3’ने अक्षरशः धुमाकूळ घातला. सर्वत्र ‘हाऊसफुल’चा बोर्ड मिरवणाऱ्या या चित्रपटाचे मॉर्निंग शोजही फुल्ल होते. काही ठिकाणी तर या चित्रपटाचे शोजही वाढवण्यात आले. इतके यश मिळवल्यानंतर या चित्रपटाच्या टीमने नुकतीच सक्सेस पार्टी साजरी केली. या वेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत सिनेसृष्टीतील काही कलाकार मंडळी, मित्रपरिवार, मीडियाचा या पार्टीत सहभाग होता. हेही वाचा - Akshaya and Hardeek : ‘मन धागा धागा जोडते नवा’; हार्दिकनं विणली अक्षयाच्या लग्नाची खास साडी चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, ’’ याचे श्रेय ‘बॉईज 3’च्या संपूर्ण टीमला जाते. कारण पडद्यावर दिसणाऱ्या आणि पडद्यामागे धावपळ करणाऱ्या प्रत्येकाची ही मेहनत आहे. या यशात प्रेक्षकांचाही सहभाग मोठा आहे. कारण त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो. ‘बॉईज’ आणि ‘बॉईज 2’ ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले म्हणूनच आम्ही ‘बॉईज 3’ प्रेक्षकांच्या भेटीला आणला आणि आता लवकरच ‘बॉईज 4’ ही आपल्या भेटीला येणार आहे. यात ही धमाल आणखी चौपट होणार आहे.’’
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रॉडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया आहेत. ‘बॉईज 3’ मध्ये सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड, ओंकार भोजने आणि विदुला चौगुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बॉईज 3 नंतर आता या चित्रपटाचा पुढचा भाग सुद्धा असाच धमाकेदार असेल यात शंका नाही.