बिपाशा बासू, करण सिंह ग्रोव्हर
मुंबई, 26 नोव्हेंबर : बी-टाऊनमधून सध्या अनेक गोड बातम्या येत आहेत. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट आई बाबा झाले त्यानंतर लगेचच अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोव्हरनेही गूडन्यूज दिली. दोन्ही जोडप्यांच्या घरी गोंडस परीचं आगमन झालं असून बिपाशा-आलिया दोघीही एका एका मुलीची आई झाल्या आहेत. आलियाने तिची मुलगी ‘राहा’ची झलक दाखवल्यानंतर आता बिपाशानेही तिची मुलगी ‘देवी’ची झलक दाखवली आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत मुलीची झलक दाखवली आहे. बिपाशाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिची मुलगी आणि पती करण सिंह ग्रोव्हरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. मुलगी आणि पती करण सिंह ग्रोव्हरसोबतचा बिपाशाचा हा फोटो चाहत्यांची मने जिंकत आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये करण सिंग ग्रोव्हरने मुलीला हातात घेतले आहे. जवळच बिपाशा आपल्या मुलीकडे प्रेमाने पाहत आहे. मात्र या फोटोमध्ये त्यांनी मुलीचा चेहरा दाखवला नाही. या पोस्टवर चाहत्यांच्या भरभरुन कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोव्हर हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. लग्नाच्या सहा वर्षानंतर या जोडप्याने आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. त्यांनी मुलीच्या जन्मानंतर लगेचंच तिचं नाव घोषित केलं. बिपाशा आणि करणने त्यांच्या लेकीचं नाव ‘देवी’ ठेवलं आहे. सध्या करण आणि बिपाशा दोघेही आई-वडिल झाल्याचा आनंद साजरा करत आहेत.
दरम्यान, बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हे बॉलिवूडचे पॉवर कपल आहे. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरची ‘अलोन’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भेट झाली होती आणि 2015 मध्ये एक वर्ष एकमेकांना डेट केलं. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. 2016 मध्ये बिपाशा-करणचे लग्न झाले. लग्नानंतर बिपाशाच्या गरोदर असल्याच्या बातम्या अनेकदा समोर येत आहेत. पण या वर्षी ऑगस्टमध्ये अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्टद्वारे गरोदरपणाची गोड बातमी शेअर केली होती.