मुंबई,10 एप्रिल- आज देशभरात राम नवमी (Ram Navami 2022) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. प्रभू रामाचा जन्मोत्सव म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. हा खास दिवस ‘आदिपुरुष’ ( Adipurush) चित्रपटाच्या दिग्दर्शकाने आणखीनच खास बनवला आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास (Prabhas) प्रभू रामाची भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांनी ‘बाहुबली’च्या राम अवताराची एक झलक शेअर केली आहे. जी पाहिल्यानंतर चाहते फारच आनंदी झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची चर्चा आहे. प्रभासला प्रभू रामच्या रूपात पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक होते. त्यामुळेच चाहते प्रभासच्या ‘आदिपुरुष’मधील ‘राम’ या व्यक्तिरेखेबद्दलचे फोटोशॉप केलेले फोटो शेअर करत होते. मात्र आता चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी सुद्धा हा चाहत्याकडून बनवलेला व्हिडीओ रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर शेअर केला आहे. यामध्ये अभिनेता राम अवतारात फारच प्रभावी दिसून येत आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी आज त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रभासच्या चाहत्यांनी बनवलेल्या चित्रपटाशी संबंधित त्याचे वेगवेगळे लुक्स दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला ओम राऊतने चाहत्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे पोस्टर चाहत्यांनी लावल्याचे व्हिडिओमध्ये लिहिले आहे.
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पुढच्या वर्षी अर्थातच 12 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत सैफ अली खान आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट आधी आमिर खानचा बहुप्रतिक्षित ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटासोबत प्रदर्शित होणार होता. परंतु त्यानंतर चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.