अवैध बांधकाम प्रकरणी बीएमसीने कंगनाला एका महिन्याची मुदत दिली आहे.
मुंबई, 10 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेना यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. अभिनेत्री शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. दरम्यान बीएमसीने कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर केलेली कारवाई सुडबुद्धीतून केल्याचा आरोप देखील शिवसेनेवर करण्यात आला. बीएमसीने बुधवारी केलेल्या कारवाईनंतर देखील काही ट्वीट कंगनाने केले होते. आज कंगनाने पुन्हा एकदा तिने शिवसेनेवर ट्विटरवरून टीका करण्यास सुरूवात केली आहे. कंगनाने आताच्या शिवसेनेची तुलना थेट बाळासाहेबांच्या शिवसेनेशी केली आहे. कंगनाने ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘ज्या विचारधारेच्या आधारे श्री बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निर्मिती केली होती, आज त्यांनी सत्तेसाठी ती विचारधारा विकून शिवसेनेवरून सोनिया सेना बनले आहेत. ज्या गुंडांनी माझ्या मागे माझे घर तोडले त्यांना सिव्हिक बॉडी म्हणून नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करू नका’.
अभिनेत्री कंगना रणौत हिने बुधवारी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेत थेट टीका केली होती. ‘करण जोहर आणि उद्धव ठाकरे यांची गँग येऊन आज त्यांनी माझं ऑफिस उद्ध्वस्त केलं. आता घर फोडाल, उद्या माझं तोंड फोडाल आणि माझा जीवही घ्याल. पण जगाला मला दाखवून द्यायचं आहे तुम्ही काय काय केलंय ते!’, असं Tweet करत कंगनाने उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं होतं.
कंगनाने एकापाठोपाठ एक ट्वीट करत शिवसेना, महाराष्ट्र सरकार आणि बीएमसीवर टीका केली आहे. तिच्या या ट्वीटचं सत्र आज देखील सुरूच आहे.