मुंबई, 24 मे- साऊथची (South) लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devrkonda) हे सध्या काश्मीरमध्ये त्यांच्या आगामी ‘कुशी’ (Kushi) या चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. एका सिक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान दोघेही गंभीर जखमी झाल्याचं समोर आलं आहे. यानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. या दोघांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, मोठ्या प्रमाणात अॅक्शन असलेल्या एका सीनच्या शूटिंगदरम्यान दोघांनाही गंभीर दुखापत झाली. त्यामुळे काही तास शूटिंग थांबवावं लागलं होतं. सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या टीममधील एका व्यक्तीने मीडियाला सांगितले की, “समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा काश्मीरमधील पहलगाम भागात एका स्टंट सीनचे शूटिंग करत होते. यादरम्यान त्यांना दुखापत झाली आहे. हा दृश्य अत्यंत कठीण होता. या दोन्ही कलाकरांना लिदर नदीवरील दोरीने बांधलेल्या पुलावरून गाडी चालवायची होती. परंतु दुर्दैवाने, वाहन खोल पाण्यात पडले आणि दोघांच्या पाठीला दुखापत झाली." चित्रपटाच्या क्रू मेंबरच्या म्हणण्यानुसार, “दोन्ही कलाकारांना ताबडतोब डल सरोवराच्या किनारी असलेल्या एका हॉटेलमध्ये नेण्यात आले. फिजिओथेरपिस्टला बोलावून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.” ही घटना विकेंडला घडली होती. मात्र, रविवारी पुन्हा समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा या दोघांनीही शूटिंग सुरू केलं. पण यावेळी शूटिंग श्रीनगरच्या डल लेकमध्ये झाल्याचं सांगितलं जात आहे.
क्रू मेंबरने दिलेल्या माहितीनुसार, विजय देवरकोंडा आणि समंथा रुथ प्रभू यांना शूटिंगदरम्यान पाठदुखीची तक्रार होत आहे. दोन्ही कलाकार कडक बंदोबस्तात शूटिंग करत आहेत आणि कोणालाही त्यांच्या जवळ जाण्याची परवानगी नाही.” दरम्यान विजय आणि समंथा यांच्या ‘कुशी’ चित्रपटाचे अनेक पोस्टर्स समोर आले आहेत.