बाईपण भारी देवा पाहिल्यानंतर आदेश बांदेकर भावुक
मुंबई, 01 जुलै : दिग्दर्शक केदार शिंदे सध्या त्यांच्या नवीन सिनेमामुळे चर्चेत आहेत. एप्रिल महिन्यात त्यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. सिनेमाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता 29 जून रोजी त्यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळण्यास सुरूवात झाली आहे. दोन्ही सिनेमांमुळे चर्चेत असलेले केदार शिंदे अनेक आठवणींना उजाळा देत आहेत. सोशल मीडियावर ते सातत्यानं सक्रीय आहेत. केदार शिंदे यांनी सिनेसृष्टीत मोठा मित्र परिवार जमवला आहे. केदार, अंकुश चौधरी आणि भरत जाधव यांची मैत्री सर्वांना आजवर पाहिलीच आहे. पण महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणजे अभिनेते आदेश बांदेकर आणि केदार शिंदे यांची मैत्री देखील फार जुनी आहे. बाईपण भारी देवा सिनेमाच्या निमित्तानं या मित्रांच्या मैत्रीचा एक भावुक क्षण समोर आलाय. बाईपण भारी देवा या सिनेमाच्या निमित्तानं केदार शिंदे सोशल मीडियावर अनेक पोस्ट, व्हिडीओ आणि फोटो शेअर करत आहेत. अनेकांबद्दल त्यांनी कौतुकांच्या पोस्ट लिहिल्या आहेत. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आदेश बांदेकर आणि केदार यांची भेट झाली आणि या भेटीचा भावुक क्षण केदार यांनी पोस्ट लिहित व्यक्त केलाय. हेही वाचा - Actors Fees : महाराष्ट्राची हास्यजत्रा की चला हवा येऊ द्या; कोणाला मिळतं सर्वाधिक मानधन?
आदेश बांदेकर यांनी बाईपण भारी देवा हा सिनेमा पाहिला. सिनेमा पाहून आदेश बांदेकर भावुक झाले आणि समोर असलेल्या केदार शिंदे यांना मिठी मारली. त्यांचा हा भावुक क्षण कॅमेरात कैद करण्यात आलाय. फोटो पोस्ट करत केदार शिंदे यांनी लिहिलंय, “गेली कित्येक वर्ष “होम मिनिस्टर” या कार्यक्रमाच्या निमित्ताने, दार उघड बये दार उघड म्हणत, वहिनींना मानाची पैठणी देणारा, त्यांचं मन जाणून घेऊन त्यांना बोलतं करणाऱ्या आदेश बांदेकरने काल बाईपण भारी देवा हा सिनेमा पाहून कडकडून मिठी मारली. बायकांच्या जवळचा भावोजी जेव्हा अशी प्रतिक्रिया देतो तेव्हाच कळून चुकतं की, आपल्याला बायकांच्या मनातलं नुसतं ऐकू नाही तर समजू लागलंय”.
केदार यांनी लिहिलेल्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत प्रेम व्यक्त केलं आहे. केदार आणि आदेश बांदेकर हे कॉलेजपासूनचे मित्र आहेत. केदार शिंदे हे परळच्या महर्षी दयानंद कॉलेजचे आणि आदेश बांदेकर माटुंग्याच्या रुपारेल कॉलेजमध्ये शिकलेले. अनेक एकांकिका स्पर्धांमधून दोघांनी काम केलं. त्यानिमित्तानं त्यांची झालेली मैत्री अनेक वर्ष टिकून आहे. दोघेही पवई येथे एकाच इमारतीत राहतात. त्यामुळे हे दोन मित्र एकमेकांचे सख्खे शेजारी देखील आहेत.