कानपूर, 3 मे : उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh Crime) सध्या वीज टंचाईवरून राजकारण जोरात सुरू आहे. वीज संकटाबाबत विरोधक योगी सरकारवर (Yogi Adityanath Government) सातत्याने हल्लाबोल करत आहेत. तर तेच दुसरीकडे परिस्थिती सुधारत आहे आणि येत्या काही दिवसांत सर्वकाही नियंत्रणात येईल, असा दावा राज्याचे ऊर्जामंत्री करत आहेत. यातच कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कानपूर येथील एका महिलेने विधनु पोलीस ठाण्यात तक्रार पत्र दिले आहे. या तक्रारीत तिने आरोप केला आहे की, परिसरातील गोलू ही व्यक्ती त्याच्या साथीदारांसह त्यांच्या मुलींचा विनयभंग (Molestation case in UP) करतो. इतकेच नाही तर जेव्हा या महिलेने त्याला विरोध केला तर आरोपीने विद्युत खांबावरून त्यांच्या घराची वीज कापली. वीज कापली गेल्यानंतर या महिलेने 112 क्रमांकावर संपर्कही साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. पीडित महिलेने आरोप केला आहे की गोलू तिच्या मुलींना सातत्याने त्रास देत असतो. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलीस आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्याचवेळी सुटका झाल्यानंतर आरोपीने पुन्हा तेच कामे सुरू केले. यासोबत महिलेने तक्रार पत्रात लिहिले आहे की, ‘माझ्या घरात आरोपी काही मोठी दुर्घटना घडवू शकतो, अशी भीती वाटते. याप्रकरणाचा तपास करुन कारवाई करण्यात यावी, अशी विनंतीही या महिलेने केली आहे. सध्या असहाय्य महिला न्यायासाठी पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारत आहे.
हे वाचा - बुलडाण्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना, शिक्षकाकडून शिक्षिकेवर बलात्कार
विधनु पोलीस ठाण्याचे काय म्हणणे?
पीडिता अत्यंत गरीब आहे. खूप कष्ट करुन ती आपल्या आणि मुलींची उपजिविका करते. अशा परिस्थितीत रात्रभर वीज नसल्याने या कडाक्याच्या उन्हात कुटुंबाची अवस्था दयनीय झाली आहे. यावर विधनु पोलीस ठाण्याच्या प्रमुख अतुल कुमार सिंह यांनी सांगितले की, दिवसभरात अनेक तक्रार पत्रे येतात, त्यात अनेक प्रकारचे आरोप केले जातात. या प्रकरणी महिलेने पोलिसांना कोणतेही दोषारोपपत्र दिले असल्यास, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल.