हरीष दिमोटे 24 डिसेंबर : दारु पिण्यासाठी शेतातून काढून ठेवलेला कापूस विकू दिला नाही म्हणून मुलाने वडीलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे. आरोपी मुलास पोलिसांनी गजाआड केले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जातेय. हा मुलगा दारुच्या आहारी गेला होता. त्यामुळे तो पैशासाठी वडिलांकडे सारखा पैशाचा तगादा लावत होता. त्यावरून त्यांची कायम भांडणं होत होती. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील सत्तर वर्षीय सोन्याबापू वाकचौरे यांचा मुलगा संतोष वाकचौरे याने दारूच्या पैशासाठी हे कृत्य केल्याचं समोर आलं आलंय. शेतातून काढून ठेवलेला कापूस विकू देण्यास वडील सोन्याबापू वाकचौरे आणि त्याच्या पत्नीने नकार दिला. या रागातून संतोषने वडील सोन्याबापू वाकचौरे ( वय ७० ) यांना जबर मारहाण केल्याची घटना काल घडली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सोन्याबापू वाकचौरे यांच्यावर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. आरोपी मुलगा घटनेनंतर फरार झाला होता. आज संतोषच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन आश्वी पोलिसांनी आरोपी संतोष विरोधात भादवी कलम 302 , 323 , 504 अन्वये गुन्हा दाखल केला असुन पोलिसांनी तात्काळ आरोपी मुलास अटक केलीय.
संतोषला त्यांच्या आई-वडिलांनी आणि बायकोनेही समजविण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तात्पुरता शांत झाल्यानंतर तो पुन्हा दारूच्या पैशासाठी तगादा लावत असे. त्यामुळे त्याचे पालक आणि बायकोही वैतागली होती. सततच्या भांडणामुळे त्याच्या घरी कायमचे वाद होत होते. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने शेवटी पालकांनी त्याला पैसे देणं थांबवलं होतं.