बीड, 27 एप्रिल: पत्नीला नांदायला न पाठवल्यानं संतापलेल्या जावयानं आपल्या सासूची कट रचून हत्या (Mother in law murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी जावयानं आपल्या पुतण्याच्या मदतीनं सासूचा काटा काढला आहे. याप्रकरणी केज पोलिसांनी आरोपी पुतण्याला अटक केली असून मुख्य आरोपी जावई (Son in law) अद्याप फरार आहे. संबंधित रविवारी दुपारी घडली असून केज पोलीस आरोपी जावयाचा शोध घेत आहेत. ही घटना बीड जिल्ह्याच्या केजजवळील साळेगाव याठिकाणी घडली असून आरोपी जावयाचं नाव अमोल वैजनाथ इंगळे आहे. त्याची पत्नी दोन महिन्यांपूर्वी प्रसूतीसाठी माहेरी गेली होती. यामुळे आरोपी जावयानं बायकोला सासरी नांदण्यास पाठवण्याचा तगादा लावला. त्यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा याठिकाणी राहणाऱ्या 45 वर्षीय सासूबाई लोचना धायगुडे आपल्या जावयाला समजावून सांगण्यासाठी आपल्या पुतण्यासोबत साळेगाव याठिकाणी आल्या होत्या. दरम्यान दुपारी 12 च्या सुमारास आरोपी जावई अमोल इंगळे हाही आपल्या पुतण्यासोबत केज - कळंब रस्त्यावरील एका हॉटेलसमोर आपल्या सासूला भेटायला आला. यावेळी पत्नीला नांदण्यास पाठवण्यावरून सासू आणि जावयामध्ये वादाला सुरुवात झाली. पण अगोदरचं संतापलेल्या जावयानं सासूला संपवण्यासाठी सर्व तयारी करून आला होता. त्याने सासूला भेटायला येताना एक कोयता आणि खिशात मिरची पूडही आणली होती. दरम्यान भांडणाला सुरुवात होताचं आरोपी जावयानं आणि त्याचा पुतण्या प्रशांत इंगळे यांनी सासूच्या डोळ्यात मिरची पूड टाकून धारदार कोयत्याने तिच्या तिच्यावर हल्ला चढवला. हे वाचा- रेल्वे स्टेशन मास्टरची विकृती, कोरोना पॉझिटिव्ह पत्नीची हत्या; स्वत:लाही संपवलं यावेळी आपल्या चुलतीला वाचवण्यासाठी पुढे आलेला पुतण्या अंकुश धायगुडे याच्यावरही आरोपींनी वार केला. या दुर्दैवी घटनेत सासूच्या मानेवर अनेक वार झाल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला तर पुतण्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी आरोपी जावई आणि त्याच्या पुतण्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी पुतण्याला अटकही केली आहे. मुख्य आरोपी अमोल इंगळे सध्या फरार असून केज पोलीस त्याचा शोध घेत आहेत.