खळबळजनक! अवैध वाळू उपसा करण्यास रोखलं, वाळू माफियांनी तरुणाची केली निर्घृण हत्या
परभणी, 30 मार्च : अवैध वाळू उपशाला (illegal sand extraction) विरोध करणाऱ्या युवकाची हत्या (murder of youth) केल्याचा प्रकार परभणी जिल्ह्यातील रावराजुर (Ravrajur Parbhani) येथे घडला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील वाळू माफियांची दादागिरी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. या अगोदर देखील जिल्ह्यामध्ये वाळूच्या प्रकरणांमधून अनेक वेळा मारहाणीच्या घटना घडल्या होत्या. परंतु प्रशासनाची बोटचेपी भूमिका आणि केलेल्या दुर्लक्षामुळे, वाळूमाफियांची दादागिरी वाढत गेली आणि हा खुनाचा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. पालम तालुक्यातील रावराजुर येथे वाळू घाटाचा काही दिवसांपूर्वी लिलाव करण्यात आला. त्यानंतर या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरू करण्यात आला होता. एक कोटीहून अधिक रुपयांना विकल्या गेलेल्या या वाळू घाटावरुन अवैध पद्धतीने वाळू उपसा होत असल्याचं समोर आलं. रात्रीच्यावेळी नियमबाह्य पद्धतीने या ठिकाणाहून वाळू उपसा होत होता. ज्याला गावातील माधव शिंदे या युवकाने विरोध केला. वारंवार विरोध केल्यानंतरही, रात्रीच्या वेळेचा वाळू उपसा काही बंद होत नव्हता. त्यामुळे माधव याने संबंधित ठेकेदारांना वाळू उपसा करू नका, असा इशारा दिला. 24 मार्चला रात्री माधव आपल्या घरी असताना संबंधित वाळू ठेकेदारांनी बोलावलं आहे असा निरोप देण्यात आला. त्यानंतर मात्र त्याने त्यांना भेटायला निघाला. परंतु त्यानंतर माधव घरी आलाच नाही. वाचा : पुणे:20 फुट उंच झाडावर कुजलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह,अंधश्रद्धेतून बळी? माधवसोबत असलेल्या अन्य एका युवकाने त्याला मारहाण घडल्याचा प्रकार पाहिला. वाळू ठेकेदार आणि त्याच्या साथीदारांनी माधव याला लोखंडी रॉड, काठ्या, दगड यांनी मारहाण केली. यामध्ये माधव गंभीररित्या जखमी झाला. माधव जखमी झाल्यानंतर मात्र, वाळूमाफियांनी धावपळ करत त्याला रुग्णालयामध्ये दाखल केले. परंतु 25 मार्च रोजी त्याची प्राणज्योत मालवली. घडलेल्या प्रकारानंतर हे प्रकरण गावपातळीवर मिटवण्यासाठी प्रयत्नही झाले. पण पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणांमध्ये पीएम रिपोर्ट आधारित गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये, वाळू घाटाचा ठेकेदार आणि त्याच्या अन्य सात साथीदारांन विरोधात, 302 सहित विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झालेल्या प्रकारानंतर सर्व आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा तपास घेत आहेत. तर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी, विविध पथके देखील स्थापण करण्यात आले आहेत. वाचा : बीड हादरलं, 10 वीच शिकणाऱ्या 2 मुलींची आत्महत्या तर एका मुलीची संशयास्पद मृत्यू या प्रकरणी महसूल प्रशासनाची संपर्क साधला असता, संबंधित वाळू घाटावर नेमका काय प्रकार झाला. कशा प्रकारे नियमांची मोडतोड केली जात होती. याविषयी तपास करण्याचे तहसीलदारांना आदेश दिले आहेत असे सांगण्यात आला आहे. परंतु प्रश्न असा येतो की, वारंवार वाळूच्या अनुषंगाने तक्रारी देऊनही, प्रशासन सुस्त का राहत यावर मात्र प्रशासन काहीही बोलायला तयार नाही. या अगोदर देखील जिल्ह्यातील विविध वाळू घाटांचा ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्यामधून स्थानिक आणि वाळू ठेकेदार यांच्यामध्ये अनेक वेळा बाचाबाचीचे प्रकार झाले. मारहाण, धमकावणे असे प्रकार देखील समोर आले. प्रशासनाने त्यावेळीही कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने, वाळू ठेकेदारांची हिम्मत वाढत गेली आणि त्यातून जिल्ह्यात वाळू माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे.