पोलीस तपासातून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार
झारखंड, 19 डिसेंबर : काही दिवसांपूर्वी घडलेलं श्रद्धा वालकर प्रकरण ताजं असताना झारखंडमध्ये अशाच प्रकारचं एक प्रकरण घडलं आहे. झारखंडमधील साहिबगंजमध्ये एका युवतीची हत्या करण्यात आली असून, पोलीस तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ‘या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात केली जाणार असून, न्यायालयात तशी विनंतीदेखील करण्यात येईल’, असं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणाच्या तपासात नेमक्या कोणत्या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. झारखंडमधील साहिबगंजमध्ये एका युवतीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. पोलीस तपासातून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आरोपी पतीने हत्येनंतर मृतदेहाचे 20 पेक्षा जास्त तुकडे केले आणि हे तुकडे नष्ट करण्यासाठी 20 हजार रुपयांत सौदा केला. या माहितीनंतर पोलिसांनी प्रकरणाच्या तपासासाठी 12 सदस्यांचं एसआयटी पथक स्थापन केलं आहे. एसआयटीने श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने या प्रकरणातील पुरावे जमा करण्यास सुरूवात केली आहे. (चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश, वृद्ध दाम्पत्यासोबत भयानक कांड, औरंगाबाद हादरलं!) आदिवासी तरुणी रुबिका पहाडीन हिची तिचा पती दिलदार अन्सारी याने हत्या केली आहे. दिलदार आणि रुबिकाचा प्रेमविवाह झाला होता. मात्र त्यांचा हा विवाह कुटुंबीयांना मान्य नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलदार अन्सारीचा मामा मैनुल अन्सारीने त्याच्या शेजारी राहणाऱ्या मो. मोइनुल अन्सारीला युवतीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आणि नंतर त्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी 20 हजार रुपयांत सौदा केला होता. रविवारी संथाल विभागाचे डीआयजी सुदर्शन मंडल आणि साहिबगंजचे एसपी अनुरंजन किस्पोट्टा यांनी बोरिया पोलीस स्टेशन हद्दीतील फाजील टोला येथील घटनास्थळी जाऊन बस स्थानकातील किराणा चालक मोहम्मद मोइनुल अन्सारी याच्या घराच्या वरच्या मजल्यावर आणि बाथरूमसह अन्य खोल्यांची पाहणी केली. तसेच अंगणवाडी केंद्रापासून 200 मीटर अंतरावरील खोलीची तपासणी केली. या ठिकाणी रात्री उशिरा एका गोणीत मृतदेहाचे अनेक तुकडे सापडले. (हेही वाचा - मित्रानेच केला घात! आठ जणांचा 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार ) पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत युवतीचा पती दिलदार अन्सारी, त्याचे आई-वडील आणि भावासह नऊ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी चौकशीदरम्यान मृत महिलेचे 18 अवयव जप्त केले आहेत. मात्र मुलीच्या मृतदेहाचं डोकं तसंच शरीराचे अनेक अवयव अद्याप सापडलेले नाहीत. या अवयवांचा शोध घेण्यासाठी पोलीस श्वान पथकाच्या मदतीने सातत्याने कोम्बिंग ऑपरेशन करत आहेत. संथाल विभागाचे डीआयडी सुदर्शन मंडल यांनी रविवारी या घटनेत आतापर्यंत केलेल्या कारवाईचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘आता या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करून एसआयटीला न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यास सांगितलं आहे. दोषारोपपत्र सादर करण्यासोबतच या प्रकरणाची जलद सुनावणी व्हावी यासाठी न्यायालयाला विनंती पत्र देण्याचे निर्देश दिले आहेत. आदिवासी युवतीच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या 12 सदस्यांच्या एसआयटी पथकाचं नेतृत्व साहिबगंजचे एसपी अनुरंजन किस्पोट्टा यांच्याकडे सोपवलं आहे. वैज्ञानिक आणि तांत्रिक बाबी गोळा करण्यासाठी हे पथक एफएसएल टीमची मदत घेईल. भक्कम आरोपपत्र तयार करण्याचा पोलिसांचा पूर्ण प्रयत्न असेल. यामुळे या प्रकरणाची सुनावणी आणि आरोपींना शिक्षा देणं सोपं होईल’, असं मंडल यांनी सांगितलं.