नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी: दिल्लीतील मंगोलीपुरी परिसरात काही तरुणांनी मिळून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. मृत तरुणाची ओळख रिंकू शर्मा अशी पटवण्यात आली आहे. काही तरुणांनी रिंकूच्या घरात घुसून त्याची चाकुने भोसकून हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे. रिंकू शर्माशी या तरुणांचे आधीपासून वैर असल्याचं समोर आलं आहे. पण आता या घटनेची आणखी एक सामाजिक बाजू समोर आली आहे. नवभारत टाइम्स ने दिलेल्या वृत्तानुसार, रिंकू शर्मा विविध सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेत होता. त्याने एकेकाळी हत्येतील आरोपीच्या पत्नीला गरजेच्या वेळी रक्तदानही केलं होतं. या घटनेतील हत्या करणाऱ्या इस्लामची पत्नी दीड वर्षांपूर्वी गरोदर होती. तिच्या प्रसुतीच्या वेळी अचानक तिची प्रकृती बिघडली, तिला रक्ताची खूप आवश्यकता होती. अशावेळी मृत रिंकू शर्माने तिला रक्त देवून तिचे प्राण वाचवले होते. एवढंच नव्हे, तर इस्लामच्या आणखी एका भावाला त्याने कोरोना काळात रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली होती.
मंगोलीपुरीमध्ये राहणारा रिंकू शर्मा पेशाने टेक्निशियन होता. तो पश्चिम विहारमधील एका रुग्णालयामध्ये काम करत होता. त्याच्या पश्चात त्याचे आई-वडील आणि दोन भाऊ आहेत. रिंकूच्या हत्येमुळे शर्मा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मीडिया अहवालानुसार, रिंकू बजरंग दलाशी संबंधित होता. मृत रिंकू शर्माचा भाऊ अंकितने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी उशीरा रात्री काहीजण त्यांचा दरवाजा ठोठावत होते. दार उघडताच हे हल्लेखोर जबरदस्तीने घरात घुसले आणि त्यांनी रिंकूवर चाकुने वार केला. यानंतर ते त्याठिकाणाहून फरार झाले. रिंकू शर्माला संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र गुरुवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मीडिया अहवालानुसार, रिंकूच्या काही जवळच्या व्यक्तींनी अशी माहिती दिली की, गेल्या महिन्यात त्याने राम मंदिर निर्माणासंदर्भात जागरुकता रॅली काढण्यामध्ये पुढाकार घेतला होता. त्यावेळी परिसरातील काही तरुणांशी रिंकूचा वाद झाला होता. पण काही वेळाने ते प्रकरण मिटले देखील होते. बुधवारी रात्री त्याच्या घराजवळच आयोजित एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हल्लेखोर आणि रिंकू यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.