माजी महापौरांवर गोळ्या झाडणाऱ्या मंटू शर्माचा खेळ खल्लास, मुंबईतून अटक
पाटणा, 2 ऑक्टोबर : बिहारच्या मुजफ्फरपूर पोलिसांना मोठं यश आलं आहे. मुजफ्फरपूरचा कुख्यात आरोपी मंटू शर्माला पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईहून अटक केली आहे. मंटू शर्मावर खंडणी, हत्या, लूट आणि आर्म्स अॅक्टशी संबंधित अनेक गुन्हे दाखल आहेत. मुजफ्फरपूरचे एसएसपी जयंतकांत यांनी पत्रकार परिषद घेवून मंटू शर्माला अटक केल्याची माहिती दिली. मंटू शर्माने मुजफ्फरपूरच्या मिठनपुरा पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असलेले बांधकाम व्यावसायिक विजेंद्र यांच्याकडे 50 लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी एक ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली होती. तसेच त्याच्यावर मजफ्फरपूरच्या माजी महापौराची हत्या करण्याचादेखील गुन्हा दाखल आहे. पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून मंटू शर्माच्या मागावर होते. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या विशेष पथकाला यश आलं आहे. मंटू शर्मा याचं खरं नाव प्रद्युम्न शर्मा असं आहे. बिहारच्या गुन्हेगारी विश्वात मंटू शर्मा हा कूप्रसिद्ध आहे. मंटू शर्मावर फक्त मुजफ्फरपूर नाही तर अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. मंटू शर्मावर मुजफ्फरपूरचे माजी महापौरांच्या हत्येचादेखील आरोप आहे. माजी महापौर समीर कुमार यांची 23 सप्टेंबर 2018 रोजी बाईकवर आलेल्या दोघांनी AK-47 ने हत्या केली होती. माजी महापौरासोबत त्यांच्या गाडीचालकाचा देखील गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. ( गोंदियात घातपात, ग्रामपंचायतच्या गेटसमोरच कर्मचाऱ्याचा चिरडून खून, नंतर पोलीस ठाण्यात समर्पण ) पोलीस रेकॉर्डनुसार मुशहरी येथील राष्ट्रीय लिची सशोधन येथील गार्ड रितेशच्या हत्याकांडमध्येदेखील मंटू शर्मा याचा हात होता. त्यामुळे त्याला 2014 साली लखनऊ येथून अटक झाली होती. लखनऊच्या गोमती नगर येथे झालेल्या चकमकीनंतर एटीएएफच्या पथकाने त्याला पकडले होते. त्यानंतर त्याला कडेकोट सुरक्षेसह मुजफ्फरपूर आणण्यात आलं होतं. त्यानंतर तो काही महिने जेलमध्ये होता. पण नंतर कोर्टातून त्याची जामीनावर सुटका झाली होती. गेल्या काही दिवसांपासून मंटू शर्मा हा पोलिसांच्या टार्गेटवर होता. त्याला अटक करणं हे जिल्हा पोलीस प्रशासनासाठी आव्हान बनलं होतं. मंटू शर्मा हा मुळचा छपरा जिल्ह्यातील बललोलपूर गावचा आहे. पण त्याने बिहारमधील अनेक शहरांमध्ये, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत गडगंज संपत्ती जमा करुन ठेवली आहे. पोलिसांचं विशेष पथक गेल्या अनेक दिवसांपासून मंटू शर्माच्या मागावर होते. अखेर आरोपी हा मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रेस करत त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला अटक करुन मुजफ्फरपूरला आणण्यात आलं.