JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / भेंडीच्या भाजीतून महिलेला विषबाधा; सुनेनं विष देऊन सासूची हत्या केल्याचा आरोप

भेंडीच्या भाजीतून महिलेला विषबाधा; सुनेनं विष देऊन सासूची हत्या केल्याचा आरोप

रात्री साडेआठच्या सुमारास सर्वांनी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर चंद्रकला व्हरांड्यात फिरू लागल्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 10 जानेवारी : सासूनं सुनेचा छळ केल्याच्या किंवा सुनेची हत्या केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी सुनेचा जीव घेतल्याची अनेक प्रकरण घडलेली आहेत. मात्र, राजस्थानची राजधानी जयपूर शहरात याच्या एकदम उलट घटना घडली आहे. जयपूरमधील मालवीयनगर येथे एका सूनेनं विष देऊन सासूची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. भेंडीच्या भाजीत विष मिसळून सासूला दिल्याचा आरोप सुनेवर आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीनं मालवीयनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या प्रकरणी सासरच्यांनी सुनेसह चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ‘दैनिक भास्कर’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ऑगस्ट 2022 मध्ये घडलेल्या या घटनेचा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) अहवाल 9 जानेवारी 2023 रोजी समोर आला आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मालवीयनगर पोलीस स्टेशनचे एसएचओ म्हणाले की, महिलेचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचं एफएसएल अहवालात स्पष्ट झालं आहे. घरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही सुन बाजूच्या प्लॉटमध्ये काहीतरी फेकताना दिसत आहे. यावरून तिच्यावर असलेला संशय आणखी बळकट होत आहे. एसएचओ हरिसिंग दुधवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक कुमार मीना (वय 63 वर्षे रा. मॉडेल टाउन, मालवीयनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भारतीय रेल्वेतून अभियंता म्हणून निवृत्त झालेले अशोक कुमार पत्नी चंद्रकला (60), मुलगा राहुल (35) आणि मुलगी वंदना (32) यांच्यासोबत राहत होते. मुलगी वंदना हिचं 2009 मध्ये लग्न झाल्यापासुन हे दाम्पत्य मुलगा राहुलसोबत दुमजली घरात राहत होतं. डिसेंबर 2017 मध्ये राहुलचं लग्न कठूमर अलवर येथील सरोज (28) हिच्या सोबत झालं. अशोक कुमार यांनी सांगितलं की, लग्न झाल्यापासुन सुन सरोज पती आणि सासूशी भांडत असे. आई-वडील (ढकेली-रमेशचंद) आणि भाऊ रिंकू यांना बोलवून घेऊनदेखील ती भांडायची. पोलीस केस करून तुरुंगात टाकण्याची धमकी देत असे. ऑक्टोबर 2018 मध्ये नातू नैतिकच्या जन्मानंतरही हे भांडण थांबलं नाही. जवळपास दोन वर्षांपासुन सुरू असलेल्या या सततच्या भांडणामुळे कुटुंब त्रस्त होतं. डिसेंबर 2020 मध्ये, सुनेच्या वडिलांनी तिला पतीसह घराच्या पहिल्या मजल्यावर वेगळं शिफ्ट केलं होतं. यानंतर ते सरोजला सात दिवसांसाठी सोबत घेऊन गेले होते. मात्र, सुमारे दोन महिने ती परत आली नाही. 16 फेब्रुवारी 2021 रोजी अशोक स्वत: जाऊन सुन सरोजला घरी घेऊन आले. यानंतर पुन्हा घरात भांडणं सुरू झाली. परत आल्यानंतर पाच दिवसांनीच तिनं पतीला धमकी दिली होती की या वेळी ती शेवटची संधी म्हणून परत आली आहे. ‘एप्रिल 2022 मध्ये ती साडेतीन वर्षाच्या मुलाला सोडून पुन्हा माहेरी गेली होती. मुलासाठी तिला फोन करून बोलवण्याचा वारंवार प्रयत्न केला. 21 जुलै रोजी तिचा भाऊ रिंकू तिला घरी घेऊन आला. या पुढे त्याची बहीण सरोज कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी भांडण करणार नाही, असं तो म्हणाला होता. सुनेचा स्वभाव बदलला आहे असा विचार करून कुटुंब आनंदी होतं. सर्वजण पुन्हा एकत्र राहू लागले. 12 दिवस सुन प्रेमानं कुटुंबासोबत राहिली. 2 ऑगस्टच्या रात्री सुनेनं जेवणात भेंडी आणि कांद्याची मिक्स भाजी केली होती. सासू चंद्रकला कांदे खात नसल्यामुळे सुनेनं तिच्यासाठी फक्त भेंडीची भाजी केली होती,’ असं अशोक कुमार यांनी सांगितलं. रात्री साडेआठच्या सुमारास सर्वांनी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर चंद्रकला व्हरांड्यात फिरू लागल्या. सुमारे पाऊण तासानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. उलट्या होऊन प्रकृती चिंताजनक झाल्यानं त्यांना तातडीने अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. चंद्रकला यांना विषबाधा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांच्या सांगण्यावरून चंद्रकला यांचा मुलगा राहुल विषाची बाटली, रॅपर किंवा पुडी सापडते का हे पाहण्यासाठी घरी गेला. घरी गेल्यानंतर त्यानं पत्नी सरोजला विषाबद्दल विचारलं असता ती घाबरून केली. सर्वांनी सारखंच जेवण केल्याचं सांगून तिनं स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, घरातील रात्रीच्या जेवणाची भांडी दररोज सकाळी घासली जात होती. मात्र, त्या दिवशी सरोजनं रात्रीच सर्व स्वच्छता करून ठेवली होती. अशोक कुमार यांनी सांगितलं की, सरोज घरातील सर्वांना विष देण्याच्या प्रयत्नात होती. पण, त्या दिवशी फक्त चंद्रकला तिच्या जाळ्यात अडकल्या. 3 ऑगस्ट 2022 रोजी चंद्रकला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैद्यकीय तक्रारीनंतर पोलिसांनी अॅपेक्स हॉस्पिटल गाठलं. पोलिसांनी चंद्रकला यांच्या मृतदेहाचं जयपूरिया रुग्णालयातील मेडिकल बोर्डाकडून शवविच्छेदन करून घेतलं. अॅपेक्स हॉस्पिटलच्या अहवालात चंद्रकला यांचा मृत्यू विषामुळे झाल्याचं सांगण्यात आलं होतं. जयपूरिया येथील पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण गोपनीय ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी एफएसएलसाठी व्हिसेरा पाठवला होता. चंद्रकला यांच्या मृत्यूनंतर सुमारे दीड महिन्यानंतर पती अशोक यांनी सुन सरोज (वय 28), तिचे वडील रमेशचंद मीना, आई ढकेली आणि भाऊ रिंकू यांच्याविरुद्ध खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा -  अंधश्रद्धेतून आईने 6 महिन्यांच्या चिमुरड्यासोबत केलं भयानक कृत्य गव्हाच्या ड्रममधून कीटकनाशक पावडर गायब -  अशोक यांनी सांगितलं की, सुन 21 जुलै रोजी घरी परतली होती. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी म्हणजे 25 जुलै रोजी गव्हात किडे आढळले असल्याचं सांगून तिनं कीटकनाशक आणलं होतं. प्रत्येकी दोन पुड्या कापडात बांधून गव्हाच्या दोन्ही ड्रममध्ये ठेवल्या होत्या. खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली होती. त्यात गव्हाच्या ड्रममध्ये ठेवलेल्या काटकनाशकांच्या पुड्यांपैकी एक पुडी नाहीशी झाल्याचं आढळलं. पोलिसांना मिळालेल्या एफएसएल अहवालातही चंद्रकला यांचा मृत्यू विषामुळे झाल्याचं समोर आलं आहे. मालवीयनगरचे एसएचओ हरिसिंग दुधवाल यांनी सांगितलं की, चंद्रकला यांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम मेडिकल बोर्डानं केलं आहे. एफएसएलनं पाठवलेल्या अहवालात विषामुळे (अॅल्युमिनियम फॉस्फाईड) मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पॅथॉलॉजीचा अहवाल येणं बाकी आहे. दरम्यान, चंद्रकला यांनी विष घेतलं की त्यांना विष दिलं गेलं याचा तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या