हाथरस, 02 मार्च: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मुलीच्या संरक्षणसाठी आवाज उठवणं तिच्या वडिलांना महागात पडलं आहे. तिची छेडछाड करणाऱ्यांविरोधात तक्रार केल्यानंतर या गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला असून यामध्ये या वडिलांचा मृत्यू झाला आहे. अमरिश शर्मा असं या मृत व्यक्तीचं नाव असून रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. हाथरस जिल्ह्यातील सासनी क्षेत्रामध्ये असणाऱ्या नौजरपूरमध्ये 1 मार्च रोजी ही घटना घडली. या गावातच अमरिश यांच्यावर चार लोकांनी गोळी झाडली. त्यामुळे संपूर्ण गावात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. जेव्हा त्यांची मुलगी दवाखान्यात पोहोचली तेव्हा तिच्या पायाखालची जमिनच सरकली. तिची छेडछाड झाल्यामुळे वडिलांनी तक्रार केली होती, आणि त्याचा बदला घेण्यासाठी गुंडांनी त्यांच्यावर गोळी झाडली. यानंतर या मुलीचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे. तिने पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा केली आहे. संबंधित मुलीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान हाथरस पोलिसांनी देखील या घटनेबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अमरिश यांच्यावर गौरव शर्मा आणि त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडल्या आहे. सोमवारी संध्याकाळी 4 च्या दरम्यान पोलिसांना याबाबतीत खबर मिळाली.
पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, मृत अमरिश यांनी अडिच वर्षांपूर्वी जुलै 2018 मध्ये गौरव विरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली होती. त्यावेळी आरोपी गौरव शर्मा तुरुंगात देखील गेला होता, पण एका महिन्यातच तो जामिनावर सुटला होता. यानंतर दोन्ही कुटुंबात वाद होता. पोलिसांनी अशी माहिती दिली की, सोमवारी गौरव शर्माची पत्नी आणि मावशी गावातील मंदिरात आल्या होत्या. त्यावेळी मृत अमरिश यांच्या दोन्ही मुली देखील त्याठिकाणी उपस्थित होत्या. त्यांच्यामध्ये काहीसा वाद झाला आणि त्याठिकाणी गौरव शर्मा आणि अमरिश शर्मा देखील पोहोचले. वाद इतका विकोपाला गेला की गौरवने त्याच्या काही माणसांना बोलावून अमरिश यांच्यावर गोळ्या झाडल्या ज्यात ते गंभीर जखमी झाले आणि रुग्णालयात दाखल करतेवेळी त्यांचा मृत्यू झाला. या चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल, अशा माहिती हाथरस पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.