लखनऊ, 19 डिसेंबर : हुंडाबळी, मारहाण किंवा विवाहित महिलांच्या छळाच्या घटना अशिक्षित समाजापुरत्या मर्यादित नाहीत. उच्चशिक्षित व सुसंस्कृत वाटणाऱ्या घरांमध्येही स्त्रियांवर अत्याचार होतो. उत्तर प्रदेशातल्या लखनऊमध्ये मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यानं पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सासूही त्यात सहभागी होती, असा पीडित महिलेचा आरोप आहे. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या नवऱ्याला अटक केली असून सासूचा शोध सुरु आहे. ‘आज तक’नं त्याबाबत वृत्त दिलं आहे. लखनऊच्या हुसेनगंज भागातल्या सरोजिनी नायडू मार्गावर राहणाऱ्या विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला 2017 साली खासगी बँकेत काम करत होती. तिथे एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत तिची अभिषेक शंकर याच्याशी ओळख झाली. अभिषेक शंकर मर्चंट नेव्हीमध्ये क्लास टू अधिकारी आहे. दोन वर्ष एकमेकांसोबत प्रेमसंबंध ठेवल्यानंतर 2019मध्ये त्यांनी लग्न केलं. तिथूनच त्यांचं खरं रूप पीडित महिलेच्या समोर येऊ लागलं. दुसऱ्याच दिवसापासून सासूनं हुंड्याचा तगादा सुरु केला, असा तिनं आरोप केलाय. कामावरून परतल्यावर रोज तिचा नवरा तिला मारायचा. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, गेल्या 10 दिवसांपासून नवरा तिला जास्तच मारत होता. रविवारी (18 डिसेंबर) त्यानं तिला मारहाण करून चावल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर गळा दाबून मारण्याचाही प्रयत्न केला. सासूनंही तिला मारून टाक असं सांगितलं, तेव्हा स्वतःला कसंबसं वाचवत एका परिचिताच्या मदतीनं ती हजरतगंज इथल्या डीसीपी कार्यालयात पोहोचली असं पोलिसांनी सांगितलं. पोलीस उपायुक्त अपर्णा रजत कौशिक यांना पीडित महिलेनं तिच्यावरील अत्याचाराबाबत सांगितलं. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पती अभिषेक शंकर याला अटक केली. पीडित महिलेची सासू सध्या फरार असून तिचा शोध पोलीस घेत आहेत. प्रभारी निरीक्षक जितेंद्र प्रताप सिंह यांनी आरोपीवर अटकेची कारवाई केली आहे. हेही वाचा - घरातून फरफटत ऊसाच्या शेतात नेऊन 17 वर्षीय मुलीवर बलात्कार; त्या अवस्थेत पीडितेचे काढले फोटो समाजात अनेक हुंडाबळीच्या घटना घडतात. त्यात काही महिलांचा बळीही जातो. हुंड्यापोटी कार, महागड्या वस्तू किंवा काही वेळेस रोख रकमेची मागणी केली जाते. ते न दिल्यास पत्नी किंवा सुनेचा छळ करणारी कुटुंबं महिलांना उपभोग्य वस्तूप्रमाणेच वागवतात. त्यासाठी अनेकदा महिलांचा जीवही घेतात. सधन आणि सुशिक्षित कुटुंबातही असे प्रकार घडतात. लखनऊमधील पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती आणि सासूवर गुन्हा नोंदवला असून पतीला अटक केली. लग्नानंतर लगेचच सासू आणि नवऱ्यानं हुंड्याची मागणी सुरु केली. सासूच्या सांगण्यावरून नवरा तिला मारहाणही करत होता. पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे अखेर तिनं पोलीस चौकीत धाव घेतली.