पिंपरी चिंचवड, 06 फेब्रुवारी: पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरी चिंचवड परिसरात जादूटोणा (Black magic) केल्याच्या कारणातून एका व्यक्तीची आर्थिक फसवणूक (Financial fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी मांत्रिक महिलेनं फिर्यादी व्यक्तीला मृत्यूची भीती दाखवून वेळोवेळी विविध कारणं देत तब्बल 7 लाख रुपयांना गंडा (Looted 7 lakh) घातला आहे. आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधित व्यक्तीने पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. किमदेवांशी सोलंकी असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी ज्योतिष महिलेचं नाव आहे. आरोपी महिला चिंचवड येथील उद्योगनगर परिसरातील श्रद्धा रेसीडेन्सी इमारतीतील रहिवासी आहे. या प्रकरणी प्रशांत बबनराव टेके यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेनं फिर्यादीला आणि फिर्यादीच्या कुटुंबीयांना होणारा मानसिक त्रास कमी करण्याच्या नावाखाली त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. हेही वाचा- गुरं चारायला गेलेल्या व्यक्तीसोबत घडलं भयंकर; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह ‘मुसलमान, पीर, फकीर, बाबा किंवा तृतीयपंथी यांच्यापैकी कोणीतरी तुमच्यावर करणी केली आहे. त्यांचा प्रभाव तुमच्या कुटुंबीयांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ही समस्या दूर करण्यासाठी गुप्त आणि आघोरी पूजा करावी लागेल. अशी पूजा केली नाही तर तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो.’ अशी भीती घालून आरोपी महिलेनं वेळोवेळी फिर्यादीकडून 7 लाख 21 हजार 491 रुपये रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने घेतले आहेत. हेही वाचा- कोल्हापुरात दिवसाढवळ्या रक्तपात; नंग्या तलवारी नाचवत दोन गटांत तुफान राडा आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादी टेके यांनी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, आघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचं समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 च्या कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलेस अद्याप अटक करण्यात आली नसून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.