कोरोनाची दीर्घकाळ दिसणारी लक्षणे
नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : गेल्या जवळपास तीन वर्षांपासून कोरोना विषाणूचा सामना आपण सर्वजण करत आहोत. काही दिवस कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर तो पुन्हा वाढतो, पण या अभ्यासापासून अद्याप सुटका मिळालेली नाही. यातच कोरोनाबद्दल होत असलेले नवीन अभ्यास आणखीच भीतीदायक आहेत. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासातून असं समोर आलंय की कोविड-19चा सामना करण्यासह कोविडच्या लक्षणांचाही रुग्णांना दीर्घकाळ सामना करावा लागू शकतो. कारण, कोरोनाची काही लक्षणं 15 महिन्यांहून अधिक काळ टिकू शकतात. या दीर्घकाळ टिकणाऱ्या लक्षणांना लाँग कोविड सिम्पटम्स म्हणतात. याची विविध लक्षणं त्रास दिसू शकतात. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल, तर त्याला दीर्घकाळापर्यंत त्याच्या लक्षणांचा त्रास होण्याची शक्यता आहे. मूड स्विंग्ज, केस गळणं, वास घेण्याची क्षमता गमावणं, ही काही सामान्य लक्षणं आहेत, जी कोरोना होऊन गेलेल्या लोकांना दीर्घकाळ दिसू शकतात. लाँग कोविड म्हणजे काय? हेल्थ शॉट्स च्या माहितीनुसार, सिव्हिअर अक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस-2 किंवा ज्याला आपण SARS-CoV-2 इन्फेक्शन म्हणून ओळखतो, त्याची लक्षणं दीर्घकाळ टिकणारी असतात. ज्यामुळे एखाद्याच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. या स्थितीला लाँग कोविड किंवा पोस्ट-कोविड सिंड्रोम म्हणतात. कोविड-19 असणाऱ्या सुमारे 10 टक्के लोकांमध्ये कोरोना झाल्यानंतर 4 ते 12 आठवड्यांनंतर पोस्ट-कोविड सिंड्रोमची लक्षणं दिसण्याची शक्यता असते. अनेक अवयवांवर होतो परिणाम कोविड-19 फक्त श्वसनमार्गापुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचा परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर आणि भागांवरही होतो. काही लक्षणं उपचाराने बरी होतात, परंतु काही लक्षणं नंतरही कायम राहतात. त्यामुळे अशा कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. कारण योग्य उपचार घेतल्यास ही लक्षणं दूर होऊ शकतात.
लाँग कोविडची सामान्य लक्षणं थकवा, वास घेण्याची क्षमता गमावणं, धाप लागणं, ब्रेन फॉग, त्वचेशी संबंधित समस्या, मूत्रमार्गासंबंधी समस्या, चक्कर येणं, माउथ अल्सर, एनोरेक्सिया, नखांमध्ये बदल आणि गॅस्टरायटिस ही लाँग कोविडची लक्षणं आहेत. हे वाचा - स्वादुपिंडाच्या कॅन्सरबाबत महत्त्वाचं संशोधन; तीन वर्षांपूर्वीच निदान शक्य… लाँग कोविडची प्रमुख लक्षणं इन्सोम्निया, केस गळणं, शिंका येणं, इज्यॅक्युलेशन डिफिकल्टी, झोपून श्वास घेण्यास त्रास होणं, लवकर थकवा जाणवणं, छाती दुखणं, आवाजात बदल आणि ताप ही लाँग कोविडची प्रमुख लक्षणं आहेत. यापैकी कोणतीही लक्षणं तुम्हाला जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार घ्या.