मुंबई, 16 फेब्रुवारी : महाराष्ट्रात कोरोनाचा (CoronaVirus) धोका पुन्हा वाढतो आहे. मुंबई, पुण्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागला आहे. तर विदर्भात नागपूर, अमरावतीतही कोरोनाचा अचानक उद्रेक झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases In Maharashtra) वाढू लागली आहे. आता आणखी एका मंत्र्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingne) यांना कोरोना संसर्ग झाला आहे. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे आणि आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी टेस्ट करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
राजेंद्र शिंगणे म्हणाले, “आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असं मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल” हे वाचा - अमरावतीकरांची झोप उडवणारी बातमी! आफ्रिका रिटर्न कोरोनाग्रस्त फोन बंद करून गायब राज्यात कोरोनाचा कहर कायम आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रुग्णांच्या संख्येत घट आल्यानंतर आता 42 व्या दिवशी पुन्हा एकदा महाराष्ट्र देशातील सर्वाधित प्रभावित राज्य ठरलं आहे. 3 हजार 365 नव्या कोरोना रुग्ण संख्येसह राज्यानं केरळला मागे सोडलं आहे. केरळमध्ये सोमवारी 2 हजार 884 कोरोना रूग्ण आढळले होते. राज्यात नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच कोरोनाचे इतके जास्त रूग्ण आढळले आहेत. सोमवारी राज्यात कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 20 लाख 67 हजार 643 वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत तब्बल 51 हजार 552 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून राज्यात रोज 3 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. हे वाचा - ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; पक्ष कार्यकर्त्यांनीच मोडला अजित पवारांचा आदेश याच पार्श्वभूमीवर पत्रकारांसोबत बातचीत करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते, की रुग्णसंख्या सलग वाढत राहिल्यास मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून कठोर पाऊलं उचलावी लागतील. कोरोना नियमांचं काटेकोर पालन करावं, उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश अजित पवारांनी दिले होते. पण त्यांच्यात पक्षातील कार्यकर्त्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात अनेक कार्यकर्ते मास्कशिवायच दिसले. सोशल डिस्टन्सिंगचंही त्यांनी पालन केलं नाही.