काय म्हणाले विशाल गर्ग वाचा
मुंबई, 09 डिसेंबर: कोरोना कालखंडात जगभरात असंख्य कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे नोकरी जाण्याचा वेदनादायी अनुभव अनेकांच्या गाठीशी आला आहे. त्यानंतर अलीकडेच नोकरी जाण्याच्या विषयाची मोठी चर्चा झाली, ती एका झूम कॉलवर (Zoom Call Layoff) 900 जणांना नोकरीवरून काढून टाकणाऱ्या एका सीईओमुळे. या सीईओला आता उपरती झाली असून, त्याने सर्वांची माफी मागितली आहे. या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय त्याने मागे घेतलेला नाही, तर आपण त्यासाठी वापरलेल्या पद्धतीबद्दल माफी मागितली आहे. त्याच्या या झूम कॉलचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यावर जगभरातून बरीच टीका झाली. त्यानंतर त्या सीईओला आपल्या चुकीची जाणीव झाली. ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ऑनलाइन हाउसिंग फायनान्स सुविधा देणाऱ्या बेटर डॉट कॉम (Better.com) या कंपनीचे सीईओ विशाल गर्ग (Vishal Garg) यांनी गेल्या आठवड्यात एका झूम कॉलवरून एका फटक्यात 900 जणांना कंपनीतून काढून टाकलं. कार्यक्षमता आणि उत्पादकता कमी असण्याचं कारण देऊन त्यांनी या कर्मचाऱ्यांना डच्चू दिला होता. त्या झूम कॉलमध्ये कर्मचाऱ्यांना उद्देशून त्यांनी असं म्हटलं होतं, ‘तुम्ही या कॉलमध्ये सहभागी असाल, तर तुम्ही अशा कमनशिबी व्यक्तींपैकी आहात, ज्यांना नोकरीवरून काढून टाकलं जात आहे. तुम्हा सर्वांना आज या क्षणापासून नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे. त्याबदल्यात तुम्हाला कोणते लाभ मिळणार आहेत, याची माहिती देणारा ई-मेल लवकरच एचआर विभागाकडून येईल, अशी अपेक्षा करावी.’ विद्यार्थ्यांनो, रात्रभर जागून बिनधास्त करा अभ्यास; येणार नाही झोप; वाचा Tips कंपनीला गेल्याच आठवड्यात एका करारातून 750 दशलक्ष डॉलर्स मिळाले आहेत. त्यामुळे कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये (Balancesheet) एक बिलियन डॉलरपेक्षा अधिक रक्कम असेल. तरीही कंपनीची बॅलन्सशीट भक्कम करणं आणि उद्दिष्टपूर्तीसाठी काम करणारं मनुष्यबळ विकसित करणं ही दोन कारणं देऊन कंपनीकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय ज्या झूम कॉलमध्ये जाहीर करण्यात आला, तो व्हायरल झाला आहे. त्यावर बरीच टीका झाली. खासकरून सीईओ विशाल यांनी ज्या भाषेत कर्मचाऱ्यांना ही बातमी दिली, त्यावर जास्त आक्षेप घेतला जात आहे. कदाचित ही बाब विशाल यांच्याही लक्षात आली असावी. त्यामुळेच त्यांना उपरती झाली. आपली पद्धत चुकल्याचं त्यांनी मान्य केलं असून, ही मोठी चूक असल्याचं ते म्हणाले आहेत. म्हणून विशाल गर्ग यांनी त्या कर्मचाऱ्यांची माफी मागणारं एक पत्र लिहिलं असल्याचं वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिलं आहे. ‘माझ्या निर्णयाचे परिणाम ज्यांना भोगावे लागणार आहेत, त्यांचा योग्य मान राखण्यात आणि त्यांचे आभार मानण्यात मी अयशस्वी ठरलो. कर्मचारीकपातीचा माझा निर्णय कायम आहे; मात्र तो ज्या पद्धतीने लागू केला, ती पद्धत मात्र चुकली. त्यातून मी तुम्हाला लज्जित केलं आहे. मी ज्या पद्धतीने ही बातमी सांगितली, त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली याची मला जाणीव झाली आहे,’ असं त्यांनी पत्रात लिहिलं आहे.